करवीर कामगार संघाचा नगरपरिषद प्रशासनास मागणी निवेदनाद्वारे इशारा
इचलकरंजी शहरातील यंञमाग उद्योगासह व अन्य उद्योगातील कामगारांना तातडीने घरकुल योजनेचा लाभ मिळावा ,अन्यथा लोकशाहीच्या मार्गाने तीव्र आंदोलन छेडू असा इशारा आज गुरुवारी करवीर कामगार संघाच्या वतीने नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.प्रदीप ठेंगल यांना मागणीच्या निवेदनाद्वारे देण्यात आला.
केंद्रातील मोदी सरकारने देशातील सर्व घटकांसाठी २०२२ सालापर्यंत घरकुल योजनेचा लाभ देण्याची घोषणा केली आहे.यासाठी महाराष्ट्र राज्यातील ५१ शहरांची निवड करण्यात आली असून यामध्ये इचलकरंजी शहराचा समावेश आहे.यामध्ये केंद्र सरकारच्या आदेशानुसार इचलकरंजी नगरपरिषदेने घरकुल योजनेसाठी
इच्छुक असलेल्या नागरिकांना अर्ज वितरीत करुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरुन घेतले आहेत.याच कालावधीत केंद्रीय गृह निर्माण व शहरी दारिद्र्य निर्मुलन मंञालयाने जून २०१५ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शक सुचना निर्गर्मित केल्या आहेत.त्यानुसार महाराष्ट्र शासनाकडून ९ डिसेंबर २०१५ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला.त्यानंतर इचलकरंजी शहरातील यंञमाग उद्योगासह सर्व उद्योगातील काम करणाऱ्या व भाड्याने रहात असलेल्या कामगारांनी घरकुल योजनेच्या लाभासाठी नगरपरिषदेकडे अर्ज भरुन दिले आहेत.याच दरम्यान नगरपरिषद प्रशासनाने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घटक क्रमांक ३ भागीदारी तत्त्वावर परवडणा-या घरकुलांच्या बांधकामासाठी शासनाच्या मालकीचा शहापूरमधील गट क्रमांक ४६८ हा उपयोगात आणण्याचा कौन्सिल ठराव मंजूर करण्यात आला आहे.परंतू ,सदर जागेवर अतिक्रमण असल्याने घरकुल योजना कार्यान्वित करण्यात अडचणी येत असल्याने या संदर्भात करवीर कामगार संघाने तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून सविस्तर चर्चा केली होती.त्यावेळी त्यांनी सदर जागेवरील अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश नगरपरिषद प्रशासनास दिले होते.तरी देखील अद्याप सदर जागेवरील अतिक्रमण काढण्यात नगरपरिषद प्रशासनाकडून चालढकल होत असल्याने घरकुल योजना मार्गी लावण्यात अडथळ्यांची भर पडली आहे.परिणामी , यंञमाग उद्योगासह अन्य उद्योगातील कामगारांना घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे.याच अनुषंगाने इचलकरंजी शहरातील यंञमाग उद्योगासह व अन्य उद्योगातील कामगारांना तातडीने घरकुल योजनेचा लाभ मिळावा ,अन्यथा लोकशाहीच्या मार्गाने तीव्र आंदोलन छेडू असा इशारा आज गुरुवारी करवीर कामगार संघाच्या वतीने नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.प्रदीप ठेंगल यांना मागणीच्या निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.प्रदीप ठेंगल यांनी सदर घरकुल योजनेच्या कार्यवाहीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.त्यामुळे भाड्याने रहात असलेल्या कामगारांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिला जाईल ,असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले.
यावेळी करवीर कामगार संघाचे हणमंत लोहार , मारुती आजगेकर ,दादासो जगदाळे , महेश लोहार ,दादू मगदूम , मिना भोरे ,विष्णू चव्हाण , दत्तात्रय घुगरे , समीर दानवाडे , मुमताज मुल्ला ,गजराबाई कोळी ,मंगल गिरी ,हुसेनबी रोन्याळ ,रेणुका नाकोड , सुरेश देवकाते ,वर्षा जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.