संदेश पारकर यांची कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे मागणी
सिंधुदुर्ग जिल्हात मार्च आणि एप्रिल महिन्याच्या ऐन हंगामी सिझनला अवकाळी वादळी पाऊस पडल्याने आंबा, काजु, कोकम, नारळ, केळी, पोफळी आणि अन्य फळ आणि पिकांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. ऐन हंगामात पडलेल्या या अवकाळी वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात शिवसेना नेते श्री.संदेश पारकर यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री श्री.दादा भुसे यांची मुंबई येथे भेट घेतली.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना नुकसान झालेल्या फळ आणि पिकांचे तातडीने रितसर पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या फळ आणि पिकांची आताच्या बाजार भावाप्रमाणे तातडीची नुकसान भरपाई देण्याची आणि नुकसानग्रस्त बागायतदार व शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी संदेश पारकर यांनी केली.
या मागणीची दखल घेऊन मंत्रीमहोदयांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकारी यांना नुकसानभरपाईचे त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश दिले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याला जास्तीत जास्त नुकसानभरपाई दिली जाईल असे आश्वासन देखील संदेश पारकर यांना दिले.