दगड खाणींची खोली नियमबाह्य?
सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली, निगुडे, वेत्ये, सोनुर्ली या गावांच्या हद्दीत गेली काही वर्षे काळ्या दगडाचे बेसुमार उत्खनन सुरू आहे. उत्खनन सुरू असलेल्या काही जमिनी राखीव वने म्हणून देखील आरक्षित आहेत. वनजमिनींवर अतिक्रमण करून दगड खाणीच्या मालकांनी वन्यप्राण्यांना राहणे मुश्कील केले असून दगड खाणींमध्ये होणाऱ्या सुरुंग स्फोटांमुळे अनेक घरांना तडे जातात, परंतु वन्यप्राण्यांच्या जीवितास देखील धोका पोहोचतो. दगड खाणी उत्खनना बाबत कोणत्याही खात्याकडून अथवा तत्सम अधिकारी वर्गाकडून उत्खननाची परवानगी न घेताच काळ्या दगडाचे अनधिकृत उत्पन्न उत्खनन सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाने भरभरून सौंदर्य प्राप्त करुन दिले असल्याने व सावंतवाडी तालुका हा पर्यटन राज्य असलेल्या गोवा राज्याच्या सीमेला लागून असल्याने पर्यटकांचा ओढा सावंतवाडीकडे त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पर्यायाने असतोच. महाराष्ट्र सरकारने पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याला घोषित केल्याने जिल्ह्यातील पर्यटन वाढीस लावणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. सावंतवाडी मतदार संघाचे आमदार तथा माजी पालकमंत्री दीपक केसरकर हे पर्यटनासाठी नेहमीच आग्रही असतात. परंतु आपल्याच मतदारसंघात वनक्षेत्र मध्ये अनधिकृतपणे सुरू असलेल्या काळ्या दगडांच्या खाणींवर कारवाई करण्याबाबत ते उदासीन का? असा प्रश्न या गावातील ग्रामस्थांना पडलेला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या चारही गावात सुरू असलेल्या काळ्या दगडाच्या उत्खननाला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे. त्यामुळेच नियमबाह्य जमिनीच्या खाली खोलवर उत्खनन करून देखील काळा दगडाच्या खाणीचे मालक बिनधास्त असतात. उत्खनन केलेल्या खाणींचे संबंधित विभागाने आजवर मोजमाप केले आहे का? असेल तर उत्खनन केलेली खोली नियमांत आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
सत्ताधारी असो वा विरोधक राजकीय लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक वेळा अनधिकृत कामांना पाठिंबा दिल्याने शासकीय मालमत्तेचे, सर्वसामान्य लोकांचे, त्याच प्रमाणे वन्यजीवांचे अतोनात नुकसान होत आहे. या चारही गावांमध्ये होत असलेल्या काळ्या दगडाच्या उत्खननाबाबत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के.मंजुलक्षुमी व खनिकर्म अधिकारी अजित पाटील यांनी याची योग्य ती दखल घ्यावी, व अनधिकृत उत्खननावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून व पर्यावरणप्रेमी यांच्याकडून होत आहे.