You are currently viewing सावंतवाडी नगरपालिकेत प्रति नगराध्यक्ष समजणाऱ्या नगरसेवकाकडून महिला कर्मचाऱ्यास धमकी…

सावंतवाडी नगरपालिकेत प्रति नगराध्यक्ष समजणाऱ्या नगरसेवकाकडून महिला कर्मचाऱ्यास धमकी…

नगरपालिका कर्मचाऱ्यांचे लेखनीबंद आंदोलन

सावंतवाडी नगरपालिकेत सत्ता बदल झाल्यानंतर अनेक बदल सुद्धा दिसून येत आहेत. सत्ता बदल झाल्यावर सावंतवाडीची परिस्थिती जिल्ह्यातील गाजलेल्या शहराप्रमाणेच होईल असंही म्हटलं जातं होतं. सत्ता बदल होऊन वर्ष सुद्धा झालं नसताना सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांकडून तिसऱ्यांदा नगरपालिका कर्मचाऱ्यांवर अन्याय होताना दिसून आला आहे. यापूर्वी एका नगरसेवकाने माफी मागितल्याने एक प्रकरण मिटले होते, दुसऱ्या एका प्रकरणात पुन्हा असं होणार नाही म्हणून अशी ग्वाही दिल्याने प्रकरण मिटले होते. परंतु पुन्हा एकदा नगरसेवकाने स्वतः नगराध्यक्ष असल्याचे समजत स्टॉल हटावच्या विषयावरून महिला कर्मचाऱ्यास धमकी दिली आहे. सदर महिला कर्मचाऱ्याने तशी लेखी तक्रार मुख्याधिकारी यांच्याकडे केली. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नगरसेवकांकडून होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात एकत्र येत नगरपालिकेसमोर लेखणी बंद आंदोलन केले.
सावंतवाडी नगरपालिकेत असलेले कर्मचारी हे सावंतवाडीतील स्थानिक असल्याने स्थानिक महिलांवर वारंवार होत असलेल्या अन्यायामुळे सर्वच कर्मचारी धास्तावले असून ते भीतीच्या छायेखाली आहेत. यापूर्वी असाच प्रकार त्या नगरसेवकाकडून घडला होता, त्या प्रकरणातील पीडित महिला कर्मचाऱ्यास आजही आपल्या दालनात कामासाठी बोलावून तासनतास बसवून विचारणा केली जाते असा मानसिक त्रास दिला जात असल्याचे कर्मचाऱ्यांकडून बोलले जात आहे. नगरपलिकेतील जुना नगरसेवक असल्याने स्वतःला प्रति नगराध्यक्ष मानणारा व नगराध्यक्षानाही किंमत न देणारा हा नगरसेवक सातत्याने महिला कर्मचाऱ्यांना टार्गेट करताना दिसून येतो. स्वतःच्या वॉर्ड मध्ये आपली पत राहिली नसल्याने बाहेरच्या वॉर्डातून निवडून आलेला शेखी मिरवणारा हा नगरसेवक आपणच नगरपालिकेचा सर्वेसर्वा असल्यासारखाच वावरत असतो.
नगराध्यक्ष संजू परब हे नवखे असून प्रशासकीय कामकाजाबाबत अननुभवी असल्याने त्या नगरसेवकावर कोणतीही कारवाई अथवा श्रेष्ठींकडे तक्रारही करताना दिसत नाहीत. त्यामुळे कधी नव्हे एवढी सावंतवाडी नगरपालिकेची बदनामी होताना दिसत आहे. महाराष्ट्रात स्वच्छतेसाठी नंबर मिळवलेली नगरपालिका गुंडगिरीसाठी गाजलेली दिसली तर नवल वाटू नये, अशी परिस्थिती गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे.
सावंतवाडी नगरपालिकेत माजी नगराध्यक्षा राहिलेल्या व आताच्या विरोधीपक्ष नेत्या सुद्धा एक महिला आहेत, उपनगराध्यक्षा सुद्धा महिला असून एका महिला कर्मचाऱ्यांवर अत्याचार होत असताना सर्वच चिडीचूप असलेल्या दिसून येत आहेत, एवढी या नगरसेवकांची दबंगगिरी सुरू आहे. एका महिला कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असताना आणि सर्व कर्मचाऱ्यांनी लेखनीबंद आंदोलन करून देखील नगरपलिकेतील विरोधी पक्षाकडून देखील काहीही दखल घेतल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे सावंतवाडीत विरोधीपक्ष शिल्लकच नसून सर्वच नगरसेवक हे मिलीभगत आहेत की काय? असा प्रश्न सावंतवाडीकरांच्या मनात उपस्थित होत आहे.
सावंतवाडीत बबन साळगावकर नगराध्यक्ष असताना ते नक्की कोणत्या पक्षाचे? अशी वारंवार विचारणा करणारे संजू परब हे सद्ध्या नगराध्यक्ष असल्याने नगरपालिकेत स्वतःच नगराध्यक्ष असल्यासारखा वावरणारा, शेखी मिरवणाऱ्या या नगरसेवकाच्या करामती, महिलांवर होणारे अन्याय, पाहता आज सावंतवाडीकरांकडून संजू परब यांनाच प्रश्न विचारला जातो आहे की, “नक्की सावंतवाडी नगरपालिकेचा नगराध्यक्ष कोण?”

प्रतिक्रिया व्यक्त करा