गझलेतील शिवाजी म्हणून ओळख असणारे अहमदनगर जिल्ह्यातील गझलकार डॉक्टर शिवाजी काळे यांचे अप्रतिम गझल
आजही बसली मनाच्या वळचणीला
काय द्यावे रोज या बोहारणीला
एक ओंबी कोवळिक जपणार होती
पण गहू आला तशातच कापणीला
नेमकी आजच कशी आली अमावस
चंद्र दाखवणार होतो चांदणीला
चित्त अन् चैतन्य ती घेऊन गेली
देह उरला फक्त माझ्या वाटणीला
या शिवाराची रया जाणार आता
पाखरू दिसले यमाच्या गोफणीला
धन हरवले तर कसे जगणार आपण
या सुखांनो वेदनांच्या राखणीला
गोडवा तो मागतो आहे झऱ्यांनो
भीक घाला सागराच्या मागणीला
पावलांचा केवढा सन्मान झाला
मानले कर्तव्य माझ्या वणवणीला
मी हिशोबाची वही जाळून जातो
कावळे आणू नका पडताळणीला
डॉ. शिवाजी काळे