माझी लेखणी साहित्य समुहाच्या संस्थापिका लेखिका कवयित्री आम्रपाली घाडगे यांचा अप्रतिम लेख
पण सांगावं बोलावं वाटले म्हणून शब्दांत मांडत आहे.
ज्या माणसांना काहीतरी वेगळं करुन दाखवायचं आहे लवकर प्रसिध्द व्हायचे आहे त्यांना प्रामाणिक कष्टाशिवाय खरचं पर्याय नसतो आणि प्रामाणिक प्रयत्नच शेवट पर्यंत साथ देतात. प्रत्येकाला यशाचे शिखर गाठण्यासाठी पहिल्या पायरीवर पाय ठेवावाच लागतो मग दुसऱ्या मग तिसऱ्या….. आता काही भाग्यवंत असेही असतात की त्यांना अगोदरच शिखरावर पोहंचलेल्याचा मदतीचा हात मिळतो म्हणजे खालच्या पायरीवरून डायरेक्ट शिखरावर ! पण खरचं त्यात तो परमानंद मिळत असेल का? नाहीच कसा मिळणार हो आणि मिळणाऱ्याला त्यात आनंद मिळतही असेल पण आत्मिक समाधान नक्कीच मिळणार नाही.आजकाल जो तो यशाचे शिखर लवकरात लवकर कसे गाठता येईल याचं प्रयत्नात जुंपलेला आहे. पण एकच सांगेन की यशाचे शिखर गाठण्यासाठी प्रत्येकाला पहिल्या पायरीवरून जावेच लागते आणि तुम्ही जर नशिबाने तिथपर्यंत पोहोचलात तर हे मात्र कधीच विसरू नका की तुम्ही सुद्धा कधीतरी त्याच पायरीवर होतात.त्यामुळे अगोदर तुम्ही हे पडताळून आवर्जून पहा कि तुम्ही कशाप्रकारे तिथंपर्यंत पोहोचलेले आहात आणि मगच स्वतःला महान समजा.
तुम्ही तुमच्या (लकी ड्रॉ ) नशिबाने यशस्वी झालात आणि यशस्वी वीरांच्या रांगेत बसलात म्हणजे बाकीचे लहान किंवा कमी नसतात.ते ही कधीतरी त्यांच्या नशिबाच्या लकी ड्रॉ ने किंवा कष्टाने तिथपर्यंत कधीतरी पोहंचतीलच. किंवा यदाकदाचित ते तुमच्यापर्यंत नाही पोहोचले तरी तूम्ही तिथपर्यंत कसे पोहोचलेले आहात हे त्यांना मात्र नक्कीच माहीत असते कष्टाने की नशिबाच्या लकी ड्रॉ ने त्यामुळे चुकूनही कोणालाही कमी लेखू नका.कमीत कमी हे तरी आत्मिक समाधान असू द्या की मी कधीच कोणाला कमी समजत नाही.
झटपटीत मिळविलेल्या यशाची व्याख्या फार निराळी असते.ती व्याख्या वाचायच्या अगोदरच संपते. तसेच प्रामाणिकपणे आणि कष्टाने मिळविलेल्या यशाची व्याख्याही निराळीच असते ती वाचणार्यांच्या निरंतर डोळ्यासमोर तरळत राहते.माणसांला यशाने जरा स्पर्शले तरी माणूस हुरळून जातो आणि नेमका इथेच फसतो. कुठलाही माणूस कधीच परिपूर्ण आणि परिपक्व नसतो कुठली ना कुठली कमतरता त्याच्यामध्ये असतेच पण तो इतक्या सहजासहजी मान्य करेल तो माणूसच कसला.आणि एकदा का हा अहंकार गोचीडा प्रमाणे चिकटला की चिकटलाच. समाजात असे बोटावर मोजण्याइतकेच लोक आहेत जे स्वतःच्या यशाची माळ हसतहसत दुसऱ्यांच्या गळ्यात घालतात ,काही स्वार्थ नाही की त्यांच्या मनात कसलाही मळ नाही.ना दुसऱ्यांना कमी लेखण्याचा मनी भाव न कुठल्याही पद्मश्री पुरस्काराची अपेक्षा.हा फक्त मनाचा मोठेपणा असतो आणि मिळालेले आत्मीक समाधान.काही लोकं तर अशी पण आसतात समोरचा व्यक्ती आपल्याला त्याच्या स्वार्थापायी चक्क खोटं बोलून खोटी स्तुती करत आहे आणि ही व्यक्ती मात्र त्यालाच सत्य समजुन भारावून जाऊन अहंकाराचे अत्तर फासून घेतें आणि मग त्या अहंकाराच्या सुंगधाचा त्या व्यक्तीवर असा काही अमल चढतो की वास्तवाल्या घामाच्या दुर्गंधीचा त्याला काही काळ विसर पडतो म्हणजेच स्वतः खरचं आपण त्या स्तुती लायक आहोत का हे ही तो विसरुन जातो.आणि त्याच्या उलट जे खरोखर स्तुती पात्र आसतात किंवा खऱ्या कौतुकाचे स्वामी आसतात त्यांना अगदीं खरोखर स्तुती केलेली पण आवडत नाही हा त्या यश कर्तबगार व्यक्तींचा मोठेपणा असतो. घमेंड किंवा अहंकार त्यांना शिवत देखील नाही किंवा त्या व्यक्ती स्वतः हून त्यांना जवळही फिरकू देत नाहीत.त्यांची सर्वात चांगली वृती म्हणजे समंजसपणा समोरचा व्यक्ती समजून घेण्याची पात्रता असते त्याच्यामध्ये. कारण यशस्वी झालेली ती व्यक्ती पण कधीं काळी त्याच परिस्थितीतून गेलेली असते.तुम्ही डॉक्टर,इंजिनिअर,टीचर, लेखक किंवा अन्य कुठल्याही पदावर असू द्यात पण त्या आधी तूम्ही एक समंजस व्यक्ती असणे गरजेचे असून तिच्यात मानवता धर्म जागरुक असायलाच हवा. कितीही मोठ्या पदावर विराजमान होऊन खुर्च्यांवर ऐटीत बसा पण पाय मात्र जमिनीवरच राहू द्या. आणि माणूस म्हणूनच रहा.
आम्रपाली घाडगे (आमु)