मालवण
मालवण तालुक्यात वादळी वारे व अवकाळी पावसामुळे मच्छीमार व शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी करून त्वरित पंचनामे करावे अशी मागणी मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख आणि जि. प. सदस्य हरी खोबरेकर यांनी मालवण तहसील प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबतचे निवेदन तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी नायब तहसीलदार गंगाराम कोकरे यांना सादर केले. यावेळी तपस्वी मयेकर, किरण वाळके, सौ. दीपा शिंदे, मंदार ओरसकर, उमेश मांजरेकर, नरेश हुले, पंकज सादये, प्रसाद आडवणकर, मनोज लुडबे, संमेश परब आदी व इतर उपस्थित होते. मालवण तालुक्यामध्ये वादळी वारे व अवकाळी पावसामुळे राहती घरे, गोठे यांचे नुकसान झाले आहे.
अचानक आलेल्या वादळी वारे व अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकरी, आंबा बागायतदार यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच मच्छीमार बांधवांना देखील नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त राहती घरे व गोठे, तसेच मच्छीमार बांधव, शेतकरी बांधव, आंबा बागायतदार यांच्या झालेल्या नुकसानीचे संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे त्वरित आदेश द्यावे. व संबंधित नुकसानीचा अहवाल शासनास पाठवून भरीव मदतीची मागणी करावी, अशी मागणी हरी खोबरेकर यांनी निवेदनातून केली आहे.