You are currently viewing श्रद्धा पाटकर यांची अनोखी संकल्पना; कणकवली बाजारपेठेत राबवला पाणपोई उपक्रम 

श्रद्धा पाटकर यांची अनोखी संकल्पना; कणकवली बाजारपेठेत राबवला पाणपोई उपक्रम 

कणकवली :

 

रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवली सेंट्रल आयोजित “तृष्णा पाणपोई” हा उपक्रम आज कणकवली येथील मंगळवार आठवडी बाजारात राबविण्यात आला. या उपक्रमांमध्ये रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या अध्यक्षा श्रद्धा पाटकर तसेच पांडुरंग पारकर, नमिता घाडीगावकर, निखील पांगम, सुजय जाधव, साक्षी चव्हाण , नम्रता गांवकर व इतर रोटरॅक्टर सहभागी झाले होते. या उपक्रमा दरम्यान सर्व रोटरॅक्टर्सना चांगले अनुभव आले.

बाजारात आलेल्या, तहानलेल्या व्यक्तींनी पाणी पिल्यानंतर आशीर्वादाचे बोल सर्व रोटरॅक्टर्सना दिले. त्या व्यक्तींच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून सर्व रोटरॅक्टर्स देखील आनंदित झाले. या उपक्रमांमध्ये रोटरॅक्टर्सनी दोन ठिकाणी तृष्णा पाणपोई ची व्यवस्था केली होती. एक पाणपोई कणकवली ढालकाठी या ठिकाणी व दुसरी पाणपोई झेंडा चौक येथे उभारण्यात आली होती.

या उपक्रमांतर्गत मंगळवारच्या आठवडी बाजारात खरेदीसाठी आलेल्या लोकांना, वयोवृद्धांना, महिलांना, लहान मुलांना, भाजी विक्रेते , शाळकरी मुले , मजूरवर्ग यांना पाणपोई उपक्रमांतर्गत मोफत थंड पाण्याची सोय करण्यात आली. या उपक्रमातून जवळजवळ २०० लिटर पाण्याचे वाटप करण्यात आले. मंगळवारच्या आठवडी बाजारामध्ये खरेदीसाठी येणाऱ्या लोकांसाठी व भाजीविक्रेते यांना कडाक्याच्या उन्हात पिण्याच्या पाण्याची होणारी गैरसोय लक्षात घेऊन या उपक्रमाची सुरुवात केली. “तृष्णा पाणपोई” उपक्रमा मध्ये डॉक्टर विद्याधर तायशेटे, नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच या उपक्रमासाठी रमेश मालवीय (रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल), कणकवली नगरपंचायत इत्यादींचे सहकार्य लाभले. “तृष्णा पाणपोई” हा उपक्रम दर मंगळवारी म्हणजेच कणकवली आठवडी बाजारा दिवशी पार पडेल असे आश्वासन रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या अध्यक्षा श्रद्धा पाटकर यांनी दिले.

तसेच या कडाक्याच्या उन्हात शरीरातील पिण्याच्या पाण्याची पातळी कायम रहावी व आरोग्यविषयक संदेश देण्याचा या उपक्रमाचा उद्देशाचे व रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवली सेंट्रल चे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा