भाजपचे माजी शहराध्यक्ष संजू शिरोडकर यांची पालिका प्रशासनाकडे मागणी
आजादी का अमृत महोत्सव अभियानातर्गंत राबवावा उपक्रम
सावंतवाडी
सावंतवाडी शहराचा मानबिंदू असलेल्या ऐतिहासिक मोती तलावातील गाळ काढून तलावाचे संवर्धन तसेच सुशोभिकरण करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आजादी का अमृत महोत्सव अभियानांतर्गत लोकसहभाग व लोकवर्गणीतून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तरी पालिका प्रशासनाने याबाबतचे नियोजन करावे, अशी मागणी भाजपचे माजी शहर अध्यक्ष संजू शिरोडकर यांनी मुख्याधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सावंतवाडी शहरातील मोती तलाव ही शहराची शान असून गेल्या अनेक वर्षात या तलावातील गाळ उपसा न झाल्याने तलावाच्या सौंदर्याला बाधा पोहोचत आहे. तसेच तलावाच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठीही हा गाळ काढण्याची गरज आहे. आजादी का अमृत महोत्सव या अभियानांतर्गत लोकसहभाग व लोकवर्गणीतून नियोजन करुन यासाठी सर्व सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी व सर्वपक्षीय स्तरातील सावंतवाडीतील नागरिकांना सामावून घ्यावे.जेणेकरून सावंतवाडी शहराची नोंद देशपातळीवर घेतली जाईल अशा प्रकारचे कार्य व्हावे, अशी मागणी संजू शिरोडकर यांनी मुख्य अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.