जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच …..”लालित्य नक्षत्रवेल” समूह सदस्य कवी लेखक दीपक पटेकर यांचे अंत्य ओळ लेखन
आणि आठवणींना अंकुर फुटले…
गाव खेड्यात प्रवास करायचा म्हणजे राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी म्हणजेच आपल्या लाडक्या लालपरी शिवाय पर्याय नाहीच…स्वतःची महागडी गाडी नसली तरी लाखोंची लालपरी म्हणजे आपली हक्काचीच गाडी. डोंगरदरी पार करत एसटी प्रत्येक गावात पोचते, त्यासाठी गाडीत किती प्रवासी आहेत हे कोणीही पाहत नाही….जनतेच्या सुविधेसाठी हक्काची एसटी उभी असतेच…मुंबईतून पहाटे रेल्वेस्टेशनवर उतरलो…पहाटेची कडाक्याची थंडी….आणि पहिली एसटी रेल्वे स्टेशनवर येण्यासाठी अजून तासभर अवकाश होता…काळोखाने हळूहळू आपलं बस्तान गुंडाळण्यास सुरुवात केली होती….अन धुक्याने निसर्गाभोवती लपेटून घेतलेली…कापसासारखी मऊ..मुलायम चादर दिसू लागली होती…. दवबिंदूंचे तुषार झाडावरील पानांच्या टोकांवरून घसरत टीप टीप आवाज करत होते…त्या दाट धुक्यात दूरवर नदी किनाऱ्यावरून टिटविचा ट्वीट ट्वीट आवाज स्पष्ट ऐकू येत होता….कुणीतरी शेकोटी पेटवली म्हणून जाऊन धग घ्यायला उभा राहिलो…अंग गोल फिरून पूर्ण शेकून घेतलं…रेल्वेतून उतरलेले काही प्रवासी रेल्वे स्थानकातच शाल गुंडाळून, कोनटोपी, स्वेटर घालून बसले होते…मंद वाऱ्यावर धुकं मात्र अंगाला स्पर्श करत दूरदूर जात होतं…गावातील थंडीचा आणि लाकडांच्या शेकोटीचा आनंद तर अवर्णनीय वाटत होता….गावच्या हवेचा अंगाला झालेला स्पर्श आपुलकीचा वाटत होता..तीन वर्षांनी पहिल्यांदा गावी आलो होतो….नोकरी आणि नोकरीनिमित्त परदेश वारी यातून वेळच मिळत नव्हता…परदेशात असलेली कडाक्याची थंडीही अनुभवलेली पण गावातील थंडीची सर कशालाच नव्हती…
शेकोटी समोर धग घेता घेता केव्हा जुन्या दिवसात पोचलो हे समजलेच नाही….कॉलेजमधून सुटल्यावर सायकलने सहा सात किलोमीटर चा प्रवास करत घर गाठायचो….मातीचे रस्ते आणि गावातील छोटे मोठे डोंगरांचे चढाव यामुळे अर्धेअधिक अंतर चालतच जायचो…परंतु स्वतःची सायकल आहे ही ऐट काही कमी नव्हती…कॉलेजला जाता येता मित्र असायचेच….परंतु कधीतरी गावात येणारी एसटी उशिरा आली किंवा चुकलीच तर कोमल माझ्या सायकलच्या मागील करियर वर बसून यायची कॉलेजमध्ये….नावाप्रमाणेच गोरा गोमटा कोमल चेहरा होता तिचा…घारे डोळे शोभून दिसायचे…गावातील सरपंचांनी कोमल एकुलती एक मुलगी…मी अभ्यासात हुशार….आणि साध्या स्वभावाचा त्यामुळे माझ्यासोबत सायकलवर कॉलेजमध्ये यायला तिला देखील काहीच वाटत नव्हते. गावातून कॉलेजमध्ये जाणारी नेमकीच तीन चार मुले असायची….आणि गावात दहावीत, बारावीत पहिला आल्याने माझे सर्वच चाहते…
कॉलेजमधून येताना कित्येकदा कोमल आणि मी वाटेत सायकलवरून पेटीतून आईसफ्रुट विकणाऱ्यांकडून २०.०० पैशांचे बर्फाचे मँगो आईसफ्रुट विकत घ्यायचो…माझ्याकडे पैसे नसायचेच…कोमल मात्र नेहमीच पैसे द्यायची…कधी मी पैसे पुढे केले तर रागवायची.. कॉलेजच्या तीन वर्षात आमची घट्ट मैत्री झालेली…
कोमल एखाद दिवस कॉलेजला आली नाही तर मी खूप हिरमुसला व्हायचो….तिच्याशिवाय कॉलेजला जावेसे वाटतच नसायचं….आणि तिच्यामुळे माझंही कॉलेज कधी चुकत नव्हतं…
हळूहळू तिच्या बद्दल माझ्या मनात प्रेम वाढू लागलं…. मैत्रीच्या निस्सीम भावनांना प्रेमाचे फुटवे फुटू लागले होते…परंतु कोमलला सांगायचं कसं?
सांगितलं आणि ती नाराज झाली तर आपली मैत्री तुटेल….ती आपल्यापासून दुरावली तर?
अशा प्रश्नांनी मन सैरभैर व्हायचं….
मनातल्या भावना मैत्रिपोटी…आणि कोमल साठी मनातच गाडून टाकल्या…
मी शिकून खूप मोठं व्हायचं हेच धेय्य समोर ठेऊन सायन्सला प्रवेश घेतला होता….त्यामुळे शिकून नोकरी करायची आणि भरपूर पैसा कमवायचा त्यानंतर कोमल समोर आपल्या मनातील भावना व्यक्त करायच्या असंच ठरवलं होतं… शिक्षण पूर्ण झालं आणि त्याच वर्षी गावातून मुंबईला जाण्यासाठी सुरू झालेल्या रेल्वेने मोठमोठी स्वप्न पापण्यांवर घेऊन घरच्यांचा आणि कोमलचा निरोप घेत मी मुंबईला गेलो होतो…
मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी मिळाली….कित्येकदा तर मला परदेश दौऱ्यावर जाण्याची संधी मिळायची….दोन दोन महिने परदेशातच राहायचो… घराचा, गावाचा संपर्क म्हणजे मुंबईत असताना पत्रव्यवहार….मुंबई…परदेशातील झगमगाटात देखील कोमल मनात घर करून होती….मनापासून केलेले….आणि सहवासाने वाढलेलं प्रेम ते….पण राहून राहून वाटायचं….मुंबईत जाताना कोमल कडे प्रेमाची कबुली दिली पाहिजे होती….आता त्या गोष्टींना वेळ झाला होता….मनात एकच आस होती…गावात पोचल्यावर कोमल दिसावी…एव्हाना गावाकडची एसटी आली….बऱ्याच वर्षांनी पुन्हा एसटी मध्ये बसलो…एसटी च्या पायदानावरून थंडीपासून बचावासाठी चेहरा झाकलेली एक स्त्री वर चढली….ओळखीची असल्यासारखी माझ्याकडे पाहत….माझ्याच शेजारच्या आसनावर विराजमान झाली…
मी तिच्याकडे सहज कटाक्ष टाकला असता….नजरानजर झाली….नजरेने ओळखी वाटली….तोच तिने प्रश्न केला…
*”आज सायकलवरून नेणार नाहीस का मला?”*
डोळ्यांच्या पटरीवरून बर्निंग ट्रेन जावी….आणि त्या लालबुंद प्रकाशात सारं स्पष्ट दिसावं….तसा तिचा झाकलेला चेहरा मला स्पष्ट दिसून गेला……*आणि आठवणींना अंकुर फुटले…*
©【दिपी】
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६