You are currently viewing स्वयंपूर्णा

स्वयंपूर्णा

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे यांची सातव्या अष्टाक्षरी काव्यलेखन स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त कविता

विषय — तिच्या स्त्रित्वाची कहाणी

” स्वयंपूर्णा ”

पूर्व जन्मीची पुण्याई
जन्म मिळतो बाईचा
तिच्या स्त्रित्वाची कहाणी
अंश ईश्वरी आईचा ||

जगे विविध भूमिका
मनी झरा भावनांचा
कुटुंबाचे स्वास्थ्य हाच
केंद्रबिंदू जगण्याचा ||

मनी जपे माणुसकी
ओढ प्रत्येक नात्याची
घरादारासाठी बने
तीच मेख आधाराची ||

घाव कित्येक सोसते
मानहानी अत्याचार
परी चिवट जिद्दीची
असे संघर्षा तयार ||

मऊ लोण्यापरी मन
घट्ट वज्रापरी आत्मा
रूपे माऊलीची न्यारी
तिच्या ठायी परमात्मा ||

नाही मागणी मानाची
परी नसावी उपेक्षा
तिच्या माणूसपणाचे
भान ठेवा ही अपेक्षा ||

तिच्या प्रती असू द्यावी
आदराची गोड वाणी
ताठ कण्याची मानिनी
तिच्या स्त्रीत्वाची कहाणी ||

ज्योत्स्ना तानवडे.
वारजे, पुणे.५८

प्रतिक्रिया व्यक्त करा