वेंगुर्ला :
चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मराठी नववर्षाला प्रारंभ झाला असून या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हिंदू धर्माभिमानी मंडळ यांनी वेंगुर्ला शहरात स्वागतयात्रेचे आयोजन केले होते. या यात्रेत शेकडो हिंदू धर्माभिमानी सहभागी झाले होते. नूतन वर्ष सर्वांना सुख, समृद्धीचे जावो, रोगराई नष्ट होवो यासाठी प्रारंभी ग्रामदैवत श्री रामेश्र्वराला श्रीफळ ठेवण्यात आले. त्यानंतर या स्वागतयात्रेला सुरुवात झाली. या यात्रेमध्ये स्त्री-पुरुषांची पारंपारिक वेशभूषा, भगवे झेंडे यांसह ढोलताशाच्या गजरात वेंगुर्ला शहरात भव्य स्वागतयात्रा काढून हिंदू नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी हिंदू तेजा जाग रे…भारत माता की जय अशा विविध घोषणांनी वेंगुर्ला परिसर दुमदुमून गेला होता.
ही स्वागतयात्रा श्री रामेश्वर मंदिराकडून शिरोडा नाका, जुना एसटी स्टँड, दाभोली नाका, बाजारपेठ, मारुती स्टॉप मार्गे पुन्हा श्री रामेश्वर मंदिर येथे यात्रेची सांगता करण्यात आली. या स्वागत यात्रेत खास आकर्षण ठरले ते सिंधुरत्न ढोल पथकाचे तर चांदेरकर महाराज भक्त मंडळी ही यात सहभागी झाले होते. तर स्त्री-पुरुषांनी पारंपारिक वेशभूषा साकारले होते. लहान मुलांनी विविध पुराणावर आधारित वेशभूषा करून आपली उपस्थिती दर्शविली. यावेळी सर्वांनी एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.