You are currently viewing नामस्मरण..

नामस्मरण..

परमार्थात पडलेले अनेक साधक वर्षानुवर्षे नामस्मरण करतात,तरी सुद्धा त्यांच्यावर नामस्मरणाचा परिणाम दिसत नाही असे आढळून येते. या संदर्भात आपण काय सांगाल?

✅  नामस्मरण या विषयासंबंधी लोकांत फार अज्ञान दिसून येते. नामस्मरण हा विषय लोक जसा समजतात तितका उथळ नाही. परमार्थात पडलेले अनेक साधक, त्यांना जसे वाटेल त्या पद्धतीने नामस्मरण करीत असतात.काही न करण्यापेक्षा काही तरी करणे बरे या न्यायाने त्यांचे चाललेले नामस्मरण बरे असे म्हणता येईल,परंतु याचा अर्थ असा नव्हे की,त्यांचे चाललेले नामस्मरण अचूक दिशेने आहे. नामस्मरण करणारे अनेक साधक केवळ एक विधी करावयाचा म्हणून नामस्मरण करीत असतात.माळ ओढीत नामस्मरण करणारे अनेक साधक,प्रत्यक्षात माळेचे मणीच ओढीत असतात.पण त्यात देवाचे स्मरण बिलकूल नसते.नामस्मरणाचे जे शास्त्र आहे त्या शास्त्रा प्रमाणे नाममंत्र सद्गुरूंकडून घ्यावयाचा असतो, परंतु प्रत्यक्षात मात्र सद्गुरूंची गरजच काय?असा प्रश्न विचारीत सद्गुरूंकडून नाममंत्र न घेताच ते नामस्मरण करीत रहातात.दुसरे जे साधक असतात ते कोणाला तरी गुरू मानून त्यांच्याकडून नाममंत्र घेतात.यापैकी बरेच तथाकथित गुरू हे स्वतःच अडाणी व अज्ञानी असतात,व शिष्यांना मंत्र देण्यापलीकडे व काही कर्मकांड सांगण्यापलीकडे ते काहीही मार्गदर्शन करू शकत नाहीत.अन्य जे काही खरे सद्गुरू असतात ते स्वतःजरी अधिकारी व नावाजलेले सत्पुरुष असले तरी साधकांना मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य किंवा कुवत त्यांच्यात नसते.याचा परिणाम असा होतो की,अशा गुरुकडून वा सद्गुरूंकडून नाममंत्र मिळून सुद्धा नामस्मरणात साधकाची फारशी प्रगती होत नाही.नामस्मरणात प्रगती होण्यासाठी नामाची गोडी लागावी लागते,आणि ही नामाची गोडी लागण्यासाठी देवाचे स्मरण घडावे लागते.देवाचे स्मरण म्हणजे दिव्य स्वरूपाचे स्मरण.परंतु दिव्य स्वरूपाची ओळख झाल्याशिवाय दिव्य स्वरूपाचे स्मरण करता येत नाही, हीच खरी अडचण आहे.ही अडचण दूर करण्याचे कार्य आत्मसाक्षात्कारी असून शब्द पारंगत असे “शाब्दे परेचि निष्णात” सद्गुरूच करू शकतात. सद्गुरूंकडून दिव्य स्वरूपाची ओळख झाली की साधकाला दिव्य स्वरूपाचा वेध लागतो.यालाच ध्यास असे म्हणतात.दिव्य स्वरूपाचा ध्यास साधकाला एकदा का लागला,की तो पहाता पहाता स्वरूपाकार होऊन जातो.तात्पर्य, “शाब्दे परेचि निष्णात” अशा सद्गुरूंकडून नाममंत्र न मिळाल्यामुळे वर्षानुवर्षे नामस्मरण करणाऱ्या साधकांवर इष्ट परिणाम झालेला दिसून येत नाही.या संदर्भात जीवनविद्येचा खालील सिद्धांत साधकांनी नीट लक्षात घ्यावा.

🎯  “किती लक्ष जप केला यापेक्षा जपात किती लक्ष होते याला महत्त्व आहे.पण त्यापेक्षाही,जप करीत असता अलक्षाकडे किती लक्ष होते,याला अधिक महत्त्व आहे.

*🙏सद्गुरू श्री वामनराव पै.🙏*

प्रतिक्रिया व्यक्त करा