डॉ. मुकुंद अंबापुरकर यांचे प्रतिपादन
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सावंतवाडी येथील कै.भाऊसाहेब परूळेकर नर्सिंग होम व आनंद पॉलिक्लिनिक येथे नव्या रुग्णसेवेची सुरुवात होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला गेली अनेक वर्षे मेंदू विकार तज्ञाची नितांत गरज जाणवत होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रुग्ण गोवा किंवा कोल्हापूर येथे जाऊन उपचार घेत होते. परंतु डॉ.मुकुंद अंबापुरकर यांनी सावंतवाडी येथील आनंद पॉलीक्लिनिक या डॉ. परुळेकर यांच्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण सेवेची सुरुवात करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्षाघात, आकडीचे आजार, कंपवात, स्मृतीभ्रंश या प्रकारच्या मेंदू विकारांच्या रुग्णांना दिलासा दिला आहे. डॉ. मुकुंद अंबापुरकर यांच्यासोबत त्यांच्या पत्नी डॉ.मृदुला अंबापुरकर या वंध्यत्व चिकित्सा तज्ञ असून गर्भधारणा न होणाऱ्या महिलांना मातृत्वाचा आनंद देण्यासाठी सामाजिक जाणिवेतून रुग्णसेवा देणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पर्यंत कोल्हापूर येथून थायरॉईड व इतर हार्मोन्स आणि ग्रंथी विकार तज्ञ येत होते. परंतु आनंद पॉलिक्लिनिक येथे सावंतवाडीतच शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेऊन सतरा वर्षे इंग्लंडमध्ये इंडॉक्रिनोलॉजीचे पुढील शिक्षण घेत मडगाव व पणजी येथे रुग्णसेवा देत असलेले डॉ.मनिष कुशे हे महिन्यातून दोन रविवारी रुग्णसेवा देणार आहेत. त्याचबरोबर सावंतवाडी शहराला तज्ञ कार्डिओलॉजिस्टची नितांत गरज होती. ही गरज आनंद पॉलिक्लिनिक येथे दर बुधवारी येऊन डॉ.अजेय मुंढेकर पूर्ण करणार आहेत. डॉ.अजेय मुंढेकर हे ओल्ड गोवा येथील “हेल्थ वे” हॉस्पिटलचे कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख आहेत.
डॉ.मुकुंद अंबापुरकर यांनी सावंतवाडीमध्ये सेवा सुरू करण्यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक डॉक्टरांशी संवाद साधून जिल्ह्यातील रुग्णसेवेची माहिती घेतली आहे. डॉ.अंबापुरकर यांनी तेलंगणा राज्यातील निजामाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयात न्यूरोलॉजी विषयाचे सह प्राध्यापक म्हणून काम केलेले आहे. कोकणात येऊन त्यांना सामाजिक भावनेतून वैद्यकीय सेवा द्यावयाची आहे, पैसा मिळविणे हा त्यांचा उद्देश नसून “रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा” या भावनेतून ते कोकणात आलेले आहेत. सावंतवाडी शहरात आज पर्यंत रुग्णसेवेसाठी बरीच खाजगी रुग्णालय सुरू झाली, परंतु तेथे मिळणारी रुग्णसेवा पाहता सावंतवाडी येथील बरेचसे रुग्ण कुडाळ अथवा गोवा, कोल्हापूर या ठिकाणी जाणे पसंत करतात. परंतु डॉ.अंबापुरकर यांनी आपण कोकणात सामाजिक जाणिवेतून रुग्णसेवा देण्याच्या भावनेतून आल्याचे सांगून सावंतवाडी सह जिल्हावासियांना दिलासा दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी डॉ.अंबापुरकर व सहकाऱ्यांकडून उत्तम असे कार्य होईल अशी अपेक्षा जिल्हावासिय करत आहेत. डॉ.मुकुंद अंबापुरकर व त्यांच्या संपूर्ण टीमला सावंतवाडी येथे सुरू करत असलेल्या नव्या रुग्णसेवेसाठी *संवाद मीडिया कडून हार्दिक शुभेच्छा*.