आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प
इचलकरंजी येथे प्रभाग क्रमांक 26 मधील नागरिकांनी नियमित पाणी पुरवठा करावा यासह
विविध मुलभूत नागरी प्रश्न मार्गी लागावेत या मागण्यांसाठी आज शुक्रवारी हत्ती चौक मेन रोड परिसरात रास्ता रोको आंदोलन केले.यावेळी आंदोलकांनी नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.माजी नगरसेविका सौ.सायली लायकर व सामाजिक कार्यकर्ते नितिन लायकर यांच्या नेतृत्वाखाली
अचानक झालेल्या या आंदोलनामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
इचलकरंजी शहरातील प्रभाग क्रमांक 26 मधील हत्ती चौक , सातपुते गल्ली , सुदर्शन चौक ,आरोपी रोड ,चर्चा काॅर्नर या परिसरात गेल्या काही दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नाही.परिणामी , नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
याबाबत वारंवार मागणीचे
निवेदन देऊन देखील नगरपरिषद प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात धन्यता मानली आहे.त्यात इचलकरंजी शहरात उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. तसेच या भागात असलेल्या जिम्नॅशियम हॉलची दुरुस्ती करणे तसेच अन्य विविध मागण्यांसाठी आज माजी नगरसेविका सायली लायकर व सामाजिक कार्यकर्ते नितीन लायकर यांच्या नेतृत्वाखाली संतप्त महिला व नागरिकांनी हत्ती चौक मेन रोड परिसरात अचानक रास्ता रोको आंदोलन केले.
त्यामुळे या रस्त्यावर सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, यावेळी विद्यमान आमदार आवाडे यांच्या पत्नी सौ.किशोरी आवाडे या
देखील रास्ता रोकोमुळे झालेल्या गर्दीमध्ये अडकल्या असता पुढील कार्यक्रमासाठी जाण्यासाठी त्यांना रिक्षाचा आधार घ्यावा लागला.यावेळी शिवाजीनगर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलन स्थगित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पालिकेचे अधिकारी आंदोलनस्थळी हजर झाल्याशिवाय आंदोलन स्थगित होणार नसल्याचा पवित्रा संतप्त आंदोलकांनी घेतला. त्यामुळे याची माहिती मिळताच पाणीपुरवठा विभागाचे जलअभियंता सुभाष देशपांडे व बाजी कांबळे यांनी पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांमार्फत नियोजन करून शहरात पहाटे साडेपाच ते रात्री दहा वाजेपर्यंत असे एक दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन केले आहे.त्यामुळे संपूर्ण शहराला एक दिवसाआड पाणी मिळणार असल्याचे आश्वासन दिल्यावर सदरचे रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी परिसरातील महिला व
नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.