मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेस जबाबदार असलेल्यांवर गुन्हा दाखल
संपादकीय…..
आपली हौस फेडण्यासाठी माणूस मुक्या प्राण्यांचा जीव वेठीस धरतो आणि बैल झुंजी सारख्या खेळातून मुक्या प्राण्याला त्याचा जीव गमवावा लागतो, म्हणजेच माणसाच्या मनोरंजनासाठी मुका प्राणी आणि मुक्या प्राण्याचा जीव म्हणजे खेळणं झालं आहे, यापेक्षा दुर्दैवी घटना दुसरी कोणतीच असू शकत नाही. मालवण तालुक्यातील तळगाव येथे आयोजित केलेल्या बैल झुंजीत अतिशय देखणा, रुबाबदार असलेला “बाबू” अखेर आपला जीव देऊन लोकांचे मनोरंजन करून मरून गेला. एका मुक्या प्राण्याचा जीव गेल्यानंतर बैल झुंजीत मिळालेल्या विजयासाठी आनंदाच्या उकळ्या फोडून नाचणाऱ्यांची कीव करावी तेवढी कमीच आहे. दोन मुक्या प्राण्यांना एकमेका समोर आणून त्यांच्यात लावलेली झुंज आणि त्या झुंजीत निष्पाप असणाऱ्या बाबूचा गेलेला जीव पुन्हा येणार आहे का? मुक्या प्राण्यांमध्ये झुंज खेळवून माणसाने नक्की साधलं तरी काय? या प्रश्नाचे उत्तर मात्र बाबू गेल्यानंतरही मिळत नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार असलेले विनायक राऊत यांचे तळगाव हे मुळगाव, आणि याच गावात अशा प्रकारची शर्मनाक गोष्ट घडणे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दुर्दैवच होय.
मालवण तालुक्यातील तळगाव येथे झालेल्या झुंजीत बाबू नावाचा रुबाबदार देखणा बैल मृत्युमुखी पडल्यानंतर अनेकांच्या सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या काहीनी बाबुला “भावपूर्ण श्रद्धांजली” वाहिली तर काहीनी “माणसांची मौजमजा आणि हौस पूर्ण करण्यासाठी तू तुझा जीव गमावलास… आज माणूस हरला, पण तू कायमस्वरूपी सर्वांच्या मनात जिवंत राहशील” अशा प्रकारच्या भावना व्यक्त झाल्या. पोटच्या पोराप्रमाणे जीव लावून वाढवून माणसांच्या मनोरंजनासाठी मुक्या प्राण्यांची झुंज लावून त्यांना फासावर चढवणे यासारखे शर्मनाक काम दुसरे कोणतेही नसेल. बैल झुंजी साठी बैलांना उतरवत असताना बैलांच्या मानेला गुंगीचे इंजेक्शन देतात आणि त्यांना स्पर्धेला उतरवतात त्यामुळे गुंगीत असणारे हे बैल मानेला डोक्याला होत असणाऱ्या इजा न समजल्याने एकमेकांवर तुटून पडतात आणि त्यातूनच त्यांना मोठ्या प्रमाणात जखमा होतात आणि ज्या प्रकारे आज मालवण येथील तळगाव येथे दोन बैलांच्या झुंजी बाबू नामक बैलाचा जसा मृत्यू झाला तसाच एखादा बैल मृत्युमुखी पडतो… त्यानंतरही मानवतेला काळिमा फासणारी गोष्ट म्हणजे तिथे उपस्थित असणारा जनसमुदाय जोरजोरात ओरडून नाचून विजय मिळाल्याचा आनंद व्यक्त करत असतो. परंतु या स्पर्धेमध्ये मारलेला म्हणण्यापेक्षा मृत्युमुखी पडलेला बैल म्हणजेच विजय नसून मानवाचा झालेला पराजय आहे. मालवण तालुक्यातील तळगाव येथे झालेल्या स्पर्धेत बैलाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या व ही स्पर्धा भरवलेल्या आयोजकांवर, त्याचप्रमाणे दोन्ही बैलांच्या मालकांवर प्रशासनाकडून कठोर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे