You are currently viewing सावंतवाडीच्या आनंद क्लीनिकमध्ये आता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सुविधा मिळणार…

सावंतवाडीच्या आनंद क्लीनिकमध्ये आता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सुविधा मिळणार…

न्यूरोलॉजीसह टेस्ट ट्यूब बेबीचा मिळणार लाभ

सावंतवाडी

येथील डॉ.भाऊसाहेब परुळेकर नर्सिंग होम व आनंद पॉलिक्निक या हॉस्पिटलमध्ये आता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची रुग्ण सेवा उपलब्ध होणार आहे. त्या ठिकाणी न्यूरोलॉजीसह टेस्ट ट्यूब बेबीचा कार्डियोलॉजिस्ट आणि ग्रंथी विकार सारख्या सेवा उपलब्ध होणार आहे. मात्र या सेवा देताना कोणत्याही रुग्णांची पैशाअभावी अडचण होवू देणार नाही. सामाजिक हीत जोपासत या ठिकाणावरून सेवा दिली जाणार आहे, अशी माहिती हॉस्पिटलचे डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे दिली. या हॉस्पिटलचे पुर्नलोकार्पण गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला २ एप्रिलला होणार आहे. या प्रसंगी खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर तसेच जिल्ह्यातील अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. लिना परुळेकर, मुकुंद अंबापुरकर, मृदूला अंबापुरकर आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. परुळेकर म्हणाले, या ठिकाणी आता नव्या दमाने आम्ही पुन्हा सुरूवात करीत आहोत. एकाच छताखाली न्यूरोलॉजीसह टेस्ट ट्यूब बेबी सारखे उपचार मिळणार. त्यासाठी तेलंगणामधून आलेले डॉ. मुंकुंद ही सेवा देणार आहे. त्यांच्या माध्यमातून मज्जारज्जू सारख्या आजारावर किंवा आकडी तसेच पक्षाघाता सारख्या आजारावर उपचार होणार आहेत. त्याच बरोबर स्त्री रोग तज्ञ डॉ. मृदुला या टेस्ट ट्यूब बेबीसह वंध्यत्व आलेल्या महिलांना तसेच स्त्रियांना असलेल्या अन्य आजारांबाबत उपचार देणार आहेत.

त्याच बरेाबर मुंबई येथील कार्डियोलॉजिस्ट अजय मुंंडेकर हे कार्डियोलॉजिस्ट म्हणून सेवा देणार आहेत. ते दर बुधवारी सकाळी साडे दहा ते दुपारी दिड या काळात उपलब्ध होणार आहेत. तर ग्रंथी विकार तज्ञ मनिष कुडे हे महिन्यातून दोन वेळा रविवारी उपलब्ध होणार आहेत. त्याच बरोबर आपण सुध्दा बालरोग सेवा पुन्हा एकदा सुरू करणार आहे, असे परुळेकर म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा