जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…. लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांची अप्रतिम काव्यरचना
खरंच कल्पना करवत नाही
तुझ्याविना राहण्याची..
आठवतंय का तुला…
पाऊस कोसळत होता, मी चिंब भिजलेली
तुझ्या हातांची ओंजळ करून तू पाऊस अडवत होतास..
पाऊसही तेव्हा बेभान… बेधुंद झाला होता
तुझं प्रेम पाहून रिता होऊन थांबला होता
भिजलेल्या तनापेक्षा हृदयाला तुझा स्पर्श उबदार वाटला होता..
शीड नसलेल्या नौकेतून खूप खोलवर आलो
सागराच्या लाटांचा तडाखा खात
एकत्रित झेलले आपण ते तुषार
खारट लाटांतून उडणारे..
चिकटलेत कितीतरी क्षार…
बदनामीचे…
बदफैली म्हणून हेटाळणीचे..
तरीही,
पवित्र होतं नातं आपलं प्रेमाचं..
वाईट वाटलं दुसऱ्यांच्या हेटाळणीचं तरी..
तुझ्या सोबत असण्याने मन आनंदी होतं..
काट्यांमध्ये फुलून हसत राहणाऱ्या..
गुलाबासारखं..
अन, आज तूच निघून गेलास…
तुडवून विस्कटून त्या नाजूक कोमल
गुलकंदाने ओतप्रोत भरलेल्या गुलाब पाकळ्या…?
सांग सख्या..
कशी राहू तुझ्याविना
नजरेनेच बलात्कार करणाऱ्या..
श्वापदांच्या जंगलात….?
©[दिपी]
दीपक पटेकर, सावंतवाडी
सिंधुदुर्ग ८४४६७४३१९६