नितेश राणेंच्या हस्ते नियुक्ती पत्र; संघटना मजबूत करण्यासाठी नव्या चेहर्यांना संधी…
देवगड
येथील युवा मोर्चा भाजपा शहर अध्यक्षपदी दयानंद पाटील यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र नुकतेच त्यांना आमदार नितेश राणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी भाजपाच्या उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांनी श्री. पाटील यांचे निवडीबद्दल अभिनंदन केले.
देवगड-जामसंडे नगरपंचायतीमधून भाजपाची सत्ता गेल्याने या ठिकाणी भाजपा संघटना मजबुत करण्यासाठी आमदार राणे यांनी पक्ष संघटना वाढण्याच्या दृष्टीकोनातून नविन चेह-यांना पक्षाची पदे दिली जात आहेत. दयानंद पाटील हे आमदार राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांनी नुकत्याच झालेल्या देवगड-जामसंडे नगरपंचायतीमध्ये प्रभाग क्रमांक १२ मधून अपक्ष उमेदवार म्हणून लढले होते. अवघ्या २१ मताने त्यांचा शिवसेनेच्या उमेदवारांकडून पराभव झाला होता. श्री. पाटील यांचा देवगड-जामसंडे शहरामध्ये चांगला जनसंपर्क असून वैयक्तिक रित्या व पक्षाच्या माध्यमातून त्यांनी येथील जनतेची कामे केली आहेत. त्यामुळे भाजपाकडून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली. यावेळी अजित गोगटे, संदिप साटम आदींसह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.