मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत मोठे वक्तव्य केले आहे. दोन्ही राजांनी भाजपकडून हा प्रश्न सोडवावा असे त्यांनी काल(२९ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत म्हटले होते. त्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. ज्यांनी आपल्या नातावाची लायकी काढली ते मराठा आरक्षणाला मान काय देणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
‘पवार साहेबांनी असं वक्तव्य करणं, आश्चर्य वाटतं… पण जे स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला मान काय देणार. या वक्तव्यावरून मराठा समाजाला एवढं कळलं पवार साहेबांकडून आणि महाविकास आघाडीकडून मराठा आरक्षणासाठी योग्य काम होणार नाही’, असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.
काय म्हणाले शरद पवार?
छत्रपती संभाजी राजे व छत्रपती उदयनराजे यांची नियुक्ती भाजपने केली आहे. त्यामुळे ते भाजपचीच भाषा बोलणार. दोन्ही राजांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपकडूनच सोडवून घ्यावा, अशी कोपरखळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मारली आहे. काल (२९ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. यावरुन, उदयनराजे यांनी आरक्षण काढूनच टाका असे म्हटले होते. तर संभाजीराजे यांनी आरक्षणाच्या आड येणाऱ्यांना ठोका अशी भूमिका घेतली होती.