वैभववाडी
प्रत्येक विद्यार्थ्याने आपले ध्येय निश्चित करून प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते.ध्येय निश्चिती प्रवासात येणा-या अडचणीवर मात करीन पुढे गेले पाहिजे. कोणत्याही यशाचे गमक हे ध्येय निश्चिती आणि प्रामाणिक प्रयत्न हाच यशाचा राजमार्ग असल्याचे प्रतिपादन आयएएस (IAS) अधिकारी तथा वैभववाडीच्या तहसीलदार श्रीम.संजिता महापात्र यांनी वैभववाडी महाविद्यालयात आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात केले.
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा विभाग व करिअर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आयएएस अधिकारी आपल्या भेटीला’ हा कार्यक्रम प्राचार्य डॉ.सी.एस. काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
स्पर्धेच्या युगामध्ये आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी स्पर्धेमध्ये उतरावा व टिकावा, विद्यार्थ्यांना एमपीएससी व यूपीएससी या स्पर्धा परीक्षेचे सखोल ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी महाविद्यालयांमध्ये स्पर्धा परीक्षा विभाग कार्यरत आहे. तसेच विद्यार्थ्यांना करिअरच्या वेगवेगळ्या संधींची माहिती देणे व त्या उपलब्ध करून देणे, उद्योगाची माहिती देणे व व्यवसायासाठी आवश्यक असणारे कौशल्य प्राप्त करून देण्यासाठी महाविद्यालयांमध्ये करियर कट्टा हा विभाग सुरू आहे.
विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्लेसमेंट सेल कार्यरत आहे. स्पर्धा परीक्षा व करिअर कट्टा विभाग यांच्या “आयएएस आपल्या भेटीला” या उपक्रमांतर्गत सोमवार दिनांक २८ मार्च २०२२ रोजी आयएएस अधिकारी मा.संजिता महापात्र यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपल्या मार्गदर्शन पर व्याख्यानांमध्ये असे सांगितले की विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आर्थिक बाबीची सबब न सांगता एक मोठे ध्येय अंगी बाळगले पाहिजे तसेच ते ध्येय पूर्ण करण्यासाठी अविरत परिश्रम घेतले पाहिजेत. या जगामध्ये काहीही अवघड नाही. स्वतःच्या जिद्दीच्या व कष्टाच्या जोरावर आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवू शकतो. त्यांनी स्वतःच्या शैक्षणिक व जीवन प्रवासातील अनेक अनुभव कथन करुन विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण केली.
प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांना कोणतेही एक ध्येय बाळगून ते पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयामध्ये असलेल्या सोयींचा पुरेपूर वापर करण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाच्या ग्रंथालयांमध्ये असलेल्या अनेक स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचे वाचन व स्पर्धा परीक्षा विभाग तसेच करियर कट्टा विभाग यांच्या अनेक उपक्रमांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. मा.संजिता महापात्र यांचा महाविद्यालयाच्यावतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर डॉ.एन.व्ही. गवळी, उपप्राचार्य ए. एम. कांबळे, प्रा. एस. एन. पाटील, प्रा. आर. बी. पाटील, प्रा. सौ. व्ही. सी. काकडे, अनेक प्राध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख डॉ.अजित दिघे व आभार प्रदर्शन प्रा.आर. ए. भोसले यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.