*एखाद्या गोष्टीचा घोळून घोळून विचार करणे म्हणजे चिंतन. जीवन घडविण्याचे किंवा बिघडविण्याचे सामर्थ्य चिंतनात आहे.”जीवनाचे वाळवंट किंवा नंदनवन करण्याचे सामर्थ्य चिंतनात आहे”,* असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे.पुराणात चिंतामणी या दगडाचे महत्त्व सांगितले आहे,ते असे की,ज्याच्या हातात चिंतामणी असतो,त्याच्या सर्व इच्छा तो पूर्ण करतो.असा हा चिंतामणी म्हणजे चिंतनच होय. *रोगाचे चिंतन केले तर आपण रोगी होतो,देवाचे चिंतन केले की आपण देव होतो.*
परंतु सामान्य लोकांना या चिंतनाचे महत्त्व समजत नाही.नको त्या गोष्टींचे चिंतन करण्याची माणसाला वाईट सवय जडलेली असते.ज्याला आपण चिंता म्हणतो ती चिंता सुद्धा प्रत्यक्षात चिंतनच होय.
*संसारात जीवन जगत असताना आपण भविष्यकाळात काय होईल त्याची चिंता करतो व भूतकाळात होऊन गेलेल्या गोष्टींचे चिंतन करतो.*
मोठ्या घड्याळाचा लंबक म्हणजे Pendulum एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत व दुसऱ्या टोकापासून पहिल्या टोकापर्यंत सारखा फिरत असतो,पण तो मधल्या बिंदूत कधीच थांबत नाही.त्याचप्रमाणे मनाचा लंबक भूतकाळातून भविष्यकाळाकडे व भविष्यकाळातून भूतकाळाकडे एकसारखा फिरत असतो,परंतु हे मन वर्तमानकाळात मात्र स्थिर रहात नाही.
*सामान्यपणे लोक भविष्याची चिंता,काळजी,भीतीयुक्त मनाने करीत असतात.त्याचप्रमाणे भूतकाळात घडलेल्या प्रतिकूल गोष्टींबद्दल ते खिन्न मनाने चिंतन करीत रहातात.त्याचप्रमाणे दुसऱ्यांची निंदा-नालस्ती करणे,इतरांना टोमणे मारणे वगैरे सर्व गोष्टी “अशुभ चिंतन” या सदराखाली येतात.’मन चिंती ते वैरी न चिंती’ व ‘चिंती परा ते येई घरा’ या म्हणीप्रमाणे हे अशुभ चिंतन करणाऱ्या माणसाचेच नुकसान होते,हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.याच्या उलट जे नित्य शुभ चिंतन करतात,इतरांचे शुभ व्हावे असे इच्छितात त्यांचे निसर्गाच्या नियमाप्रमाणे कल्याणच होते,असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे.* दुसरा मुद्दा असा की,आपल्याला कोणी मान दिला तर तो आपण चटकन विसरतो,पण आपला कोणी अपमान केला तर त्याचे आपण दीर्घकाळ चिंतन करीत रहातो.
त्याचप्रमाणे जीवनात मिळालेल्या चांगल्या गोष्टींचा आपल्याला सहज विसर पडतो परंतु वाईट गोष्टींचा नित्य आठव असतो. *थोडक्यात,अनिष्ट विचार मनात घोळवत ठेवणे व अशुभ चिंतन करीत रहाणे,हा जणू माणसाचा स्वभाव होऊन बसलेला आहे.यालाच निराशाजनक विचारसरणी(Negative thinking) असे म्हणतात.As you think so you become’ हा जीवनविद्येचा महत्त्वाचा सिद्धांत आहे.या सिद्धांताला अनुसरून या अशुभ चिंतनाचे दुष्परिणाम अनुभवाला येतात.म्हणून सुखी व यशस्वी जीवनासाठी सातत्याने शुभ चिंतन करण्याची नितांत गरज आहे.*
🙏~सद्गुरु श्री वामनराव पै.🙏