—- प्रसंन्ना ऊर्फ बाळु देसाई , जिल्हा सरचिटणीस , भाजपा सिंधुदुर्ग
आणखी 6 महिने मोफत धान्य मिळणार; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला (पीएम-जीकेएवाय) आणखी सहा महिने मुदतवाढ देण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. यामुळे देशातील 80 कोटी गरीब जनतेला या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे.
कोरोनाची लाट नियंत्रणात येत असली, तरी भारतात सर्व आर्थिक व्यवहार हळूहळू सुरू होत आहेत. यादरम्यान काही नागरिकांची परिस्थिती खालावली तर कोणाच्या हातातील काम गेल्याने हातात पैसा राहिला नाही. गरीब लोकांच्या नशिबी आणखी गरिबी आल्याने, आर्थिक व्यवस्था सुरळीत होण्याच्या काळात एकही गरीब कुटुंब उपाशी राहू नये म्हणून हा निर्णय घेतला आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना 31 मार्च रोजी संपणार होती, पण आता ही योजना 30 सप्टेंबरपर्यंत लागू राहील, असा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. या योजनेच्या माध्यमातून रेशनकार्डवर गरिबांना प्रतिव्यक्ती महिन्याला एकूण 5 किलो मोफत धान्य मिळत आहे. त्यामध्ये या योजनेतील नागरिकांना तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ असे प्रति व्यक्ती दिले जाते.
कोरोना काळात गरीबांना आधार मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च 2020 मध्ये ही योजना सुरू केली होती. पण कोरोनानंतर देशात आर्थिक परिस्थिती मात्र बिघडली दिसत आहे. आता कोरोना पूर्णपणे नियंत्रणात असूनही गरीबांबरोबर संवेदनशीलता दाखवत या योजनेची मुदत वाढवली आहे, असे अन्नधान्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी ट्विट करत म्हणाले, “देशातील सर्व नागरिकांच्या शक्तीत भारताचे सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य आणखी वाढवण्यासाठी सरकारने ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना’ (Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana) आणखी 6 महिन्यांनी वाढवली आहे. केंद्र सरकारची ही योजना चालू वर्षी सप्टेंबर 2022 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील 80 कोटींहून अधिक जनतेला आधीसारखा लाभ आता घेता येईल”, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत माहीती दिली आहे.
यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे व गोरगरीब जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार व्यक्त करत आहे .