श्री पंचम खेमराज महाविद्यालय माजी विद्यार्थी संघ, सुंदरवाडी ग्रुपचे आयोजन
सावंतवाडी शहराला संस्थान काळापासून सांस्कृतिक वारसा लाभला आहे. सांस्कृतिक वारसा जपताना सावंतवाडी शहरात वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतच असतात. कविवर्य केशवसुत डॉ. वसंत सावंत, साहित्यिक विद्याधर भागवत अशा अनेकांनी हा साहित्यिक वारसा जपत पुढे नेला, तोच वारसा सावंतवाडीतील अनेक साहित्यिक चालवताना दिसत आहेत. सुंदरवाडीच्या सांस्कृतिक नगरीत आज सायंकाळी ठीक ६.०० वाजता श्रीराम वाचन मंदिर मध्ये श्री.पंचम खेमराज महाविद्यालय माजी विद्यार्थी संघ, सुंदरवाडी ग्रुपने सावंतवाडीतील सुपुत्र कवी श्री. आनंद पेंढारकर व मुंबई येथील कवी महेश देशपांडे यांच्या सुरेल काव्य मैफिलीचे आयोजन केले होते. “कवितेचे बेट” या शीर्षकाखाली आयोजित केलेल्या काव्य मैफिलीला सुंदरवाडी ग्रुप सावंतवाडीचे सदस्य उपस्थित होते. यात प्रामुख्याने माजी डी वाय एस पी श्री.दयानंद गवस, अभय पंडित, जगदीश सावंत अशा अनेक मित्र-मैत्रिणींनी उपस्थित राहत कवितांचा आस्वाद घेतला.
सावंतवाडीचे सुपुत्र कवी आनंद पेंढारकर व त्यांचे मुंबईस्थित मित्र कवी महेश देशपांडे यांनी तालबद्ध व सुरबद्ध केलेल्या स्वरचित कविता गायल्या, वाचून सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रेम काव्य पासून सुरू झालेला हा काव्यमय प्रवास सामाजिक विषयांवरील कवितांवर येऊन थांबला. यात कवी आनंद पेंढारकर यांची “बोन्साय” ही कविता भाव खाऊन गेली. एकापेक्षा एक सरस कवितांचा नजराना कवी आनंद पेंढारकर, कवी महेश देशपांडे यांनी सादर केला. त्यांना संगीत साथ केली ती त्यांच्याच काव्य शाळेतील विद्यार्थी मूळ इन्सुली येतील स्वप्नील परब याने. संध्याकाळी सहा वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला, व रात्री आठ वाजता संपला. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजक मा. डीवायएसपी दयानंद गवस यांनी कवी श्री.आनंद पेंढारकर श्री.महेश देशपांडे व परब तसेच उपस्थित सर्व मित्रमंडळींचे, रसिक श्रोत्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाला श्री दयानंद गवस, अभय पंडित, संतोष मुंज, दीपक पटेकर, जगदीश सावंत, सुराणा, अतुल पेंढारकर, प्रविणा पेंढारकर यांच्यासह सुंदरवाडी ग्रुपचे अनेक सदस्य व रसिक श्रोते उपस्थित होते.