You are currently viewing विचार प्रदूषण

विचार प्रदूषण

 

इतिहास कालापासून मानवी जीवनात विविध समस्या निर्माण झाल्या व अजूनही होतच आहेत. ह्याचे मूळ कारण शोधण्याचा आतापर्यंत प्रयत्नच झाला नाही. म्हणूनच इतिहासाची पुनरावृत्ती होऊन राहिलेली आहे. सर्व समस्यांचे मूळ कारण न शोधल्यामुळे जे उपाय केले जातात ते थातूर मातूर स्वरुपाचे असतात. मानवी जीवनात राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक व शैक्षणिक अशा सर्व प्रकारच्या सुधारणा आतापर्यंत झाल्या. त्यामुळे मानवी जीवनातील मूळ समस्या सुटली नाही. परिणामी मानव जातीची प्रगती झाल्यासारखी दिसते, परंतु प्रत्यक्षात मात्र तो जेथे होता तेथेच आहे असे आढळून येते. *जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून इतिहास कालापासून होत असलेले विचार प्रदूषण हेच सर्व समस्यांचे मूळ कारण होय.* परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की, या सत्याचे ज्ञान मानव जातीला झालेले दिसत नाही व त्यामुळे त्या मूळ समस्येवर उपाय योजना सुद्धा केली जात नाही. *मानवी जीवनात सैतान,अज्ञान स्वरुपात वावरत असतो.या अज्ञानातूनच अहंकार, अभिमान, अविचार, अविवेक, असूया व असमाधान अशा सर्व प्रकारच्या अनिष्ट गोष्टी निर्माण होऊन विचार प्रदूषण होत असते.* देव,धर्म,संस्कृती,नियती,मन,सुख, पाप-पुण्य वगैरे सर्व गोष्टी संबंधी माणसाला कमालीचे अज्ञान असते.या *अज्ञानाच्या अधिष्ठानावर जे शिक्षण, शिकवण व संस्कार कळत किंवा नकळत केले जातात, त्याप्रमाणे प्रचंड स्वरुपात विचार प्रदूषण निर्माण होते.* ध्वनीतून ज्या Vibrations म्हणजे लहरी निर्माण होतात, त्यांचे बरे-वाईट परिणाम मानवी जीवनावर होत असतात. *ध्वनीतून निर्माण होणाऱ्या लहरीपेक्षा, विचारांतून निर्माण होणाऱ्या लहरी (vibrations) अत्यंत सूक्ष्म स्वरुपाच्या असून त्या सर्व विश्वात पसरतात व त्यांचे बरे, वाईट परिणाम मानवी जीवनावर होतच असतात. म्हणून जोपर्यंत विचार प्रदूषण या मूळ समस्येवर प्रभावी उपाय योजना केली जात नाही,तोपर्यंत मानव जातीला सुख,शांती,समाधान मिळणे शक्य नाही,असा जीवनविद्येचा स्पष्ट सिद्धांत आहे.*

🙏~सद्गुरु श्री वामनराव पै.🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा