सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात विशेष उन्हाळी मोहिम राबवून शितपये, आईस्क्रिम, बर्फ यांचे उत्पादक व विक्रेते यांच्या तपासण्या करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त तुषार शिंगाडे यांनी केले आहे.
मागील काही दिवसांपासून उन्हाचा कहर वाढत असून गर्मीच्या झळा जिल्ह्यातील नागरिकांना बसत आहेत. अशावेळी गर्मीवर मात करण्यासाठी नागरिकांकडून शितपेये, आईस्क्रिम, बर्फ इत्यादींची मोठ्या प्रमाणावर मागणी करण्यात येते.
अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 च्या अमंलबजावणी करिता स्थापन झालेल्या जिल्हास्तरिय सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेली आहे. या बैठकिमध्ये अशासकिय सदस्य तथा पोषण आहार तज्ञ डॉ. परुळेकर यांनी तसेच ग्राहक संस्थांचे प्रतिनिधी शिवाजी घोगळे यांनी जिल्हयातील नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने उन्हाळ्याच्या अनुषंगे शितपेय, आईस्क्रिम, बर्फ यांचे उत्पादक व विक्रीते यांच्या तपासण्या करण्याची विनंती समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचेकडे केली असता, अन्न व ओैषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) तुषार शिंगाडे यांनी जिल्ह्यामध्ये विशेष उन्हाळी मोहिम राबवून शितपेये, आईस्किम, बर्फ यांचे उत्पादक व विक्रेते यांच्या तपासण्या करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
तसेच शितपेये व आईस्क्रिम उत्पादक यांनी ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने चांगले व दर्जेदार उत्पादन करुनच विक्री करण्याचे, तसेच घाऊक वितरक यांनी परवाना धारक उत्पादकाकडूनच खरेदी बिल घेऊनच शितपेये व आईस्क्रिम खरेदी करावे आणि परवानाधारक किरकोळ विक्रेत्यांनाच पुरवठा करण्याचे आवाहन श्री. शिंगाडे यांनी जिल्ह्यातील सर्व उत्पादकांना व विक्रेत्यांना केलेले आहे. त्याचबरोबर खाद्य बर्फ उत्पादकांनी प्रशासनाचा परवाना घेऊनच स्वच्छ व शुद्ध पाण्यापासूनच खाद्यबर्फाचे उत्पादन करुन विक्री करण्याचे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.
नियमबाह्य पद्धतीने शितपेये व आईस्क्रिम आणि बर्फ यांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात मोहिमेमध्ये सक्त कारवाई केली जाणार असल्याचे देखील प्रशासनाच्या वतीने श्री.शिंगाडे यांनी स्पष्ट केलेले आहे.
जिल्ह्यातील शितपेये, व आईस्क्रिम आणि बर्फ उत्पादक व विक्रेते यांच्या बाबतीत काही विशेष माहिती अथवा तक्रारी असल्यास सहाय आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन कार्यालयत सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे लेखी किंवा दुरध्वनी क्रमांक 02362 228881 वर अथवा अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त यांच्या मोबाईलवर 7506373761 क्रमांकावर तक्रार स्वरुपात पाठविण्याचे आवाहन श्री शिंगाडे यांनी केले आहे.