गेले चार दिवस सावंतवाडी शहरात ढगाळ वातावरण होते, उष्णतेचा पाराही चढलेला होता. आज सकाळपासून ढगाळ वातावरणा सोबतच पावसाळी स्वरूप धारण करून पावसाच्या आगमनाचे संकेत दिले. दुपारनंतर काळेकुट्ट ढग आकाशात दिसू लागले आणि सायंकाळी चारच्या सुमारास वातावरणात गारवा पसरला. या वातावरणातील गारव्या सोबत गडगडाटासह जोराचे वारे वाहू लागले आणि मेघगर्जनेच्या पाठोपाठच मुसळधार पावसाने सावंतवाडी शहराला स्वच्छ धुऊन काढले.
बाजारपेठेतील फिरत्या व्यापाऱ्यांचे तसेच भाजी विक्रेत्यांचे मात्र पावसामुळे हाल झाले. अवेळी आलेल्या पावसामुळे भाजी मार्केट परिसरात तुंबलेल्या गटारांमुळे पाणी साचले होते. अवकाळी पावसामुळे वातावरण आल्हाददायक झाले परंतु आंबा काजू बागायतदार यांच्या मात्र चिंतेत भर पडली आहे. सावंतवाडीच्या आजूबाजूच्या परिसरात देखील पाऊस झाल्याची माहिती मिळत आहे.