पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा देशात इंधन दरवाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर आज घरगुती गॅस सिलेंडरही महागला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली आहे. आज मंगळवारपासून हे नवीन दर लागू होणार आहेत.
घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानंतर आता मुंबईत सिलेंडरची किंमत 949.50 रुपये झाली आहे. मागी वर्षी 6ऑक्टोबरला घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा सिलेंडर 50 रुपयांनी महाग झाला आहे. त्यामुळं आधीच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला आणखी एक झटका बसला आहे.
एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने मध्यमवर्गीय आणि सामान्यांचे किचन बजेट बिघडणार आहे. खाद्य तेलाच्या किंमतीत होत असलेले चढ-उतार, भाज्या, धान्याच्या दरवाढीने आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांवर आता गॅस आणि इंधन दरवाढीची कुऱ्हाड कोसळली आहे.
अनेक दिवसांनी डिझेल-पेट्रोलच्या दरातही पुन्हा एकदा वाढ झाली आहे. डिझेल आणि पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ झाली आहे. वाढलेले दर आजपासून (मंगळवार) लागू झाले आहेत.
मुंबईत आज पेट्रोलचे दर 110.77 रुपये इतके आहेत. तर डिझेलची किंमत 94.94 रुपये इतकी आहे. जागतिक बाजारपेठेतही कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. रशिया युक्रेन युद्धाआधी कच्च्या तेलाचे दर 100 डॉलरच्या खाली होते. आज ते 118 डॉलर प्रति बॅरल इतके आहेत.