संजू शिरोडकर यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
सावंतवाडी
येथील मोती तलावात मोठ्या प्रमाणात गाळ असल्यामुळे पाण्याची पातळी कमी होत आहे. त्याचा परिणाम परिसरातील विहिरींच्या पाणीसाठ्यावर होत असून, संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी गाळ काढून तलावाला नवसंजीवनी देण्यात यावी, अशी मागणी सावंतवाडी भाजपचे माजी शहराध्यक्ष संजू शिरोडकर यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन सावंतवाडीचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, शहराच्या मध्यभागी वसलेल्या संस्थानकालीन मोती तलावात मोठ्या प्रमाणात गाळ असल्यामुळे पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे शहरातील लोकांबरोबर पक्षी, जलचर प्राणी यांना पाणी मिळण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पशु-पक्ष्याचे जीवन धोक्यात आले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून तलावातील गाळ काढण्यात यावा. तसेच धोकादायक असलेले तलावाची कठडे तात्काळ दुरुस्त करण्यासंदर्भात योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे.