सौदागर यांचे साहित्य प्रदेशिकतेच्या सीमा ओलांडून भविष्यात भारतीय साहित्याच्या विशाल अंगणात प्रवेश करील : श्री गजानन मांद्रेकर
कवी विनय सौदागर यांच्याकडे उत्तम निरीक्षण शक्ती असल्याने त्यांच्या साहित्यात नेहमीच्या जीवनातील साधे,सोपे विषय उत्तमरितीने,कलात्मकतेने चिंतनशीलता घेऊन येतात.परंतु साहित्यात बटबटीतपणा, सवंगपणा नाही,त्यामुळे त्यांचं साहित्य भविष्यात प्रादेशिकतेच्या सीमा ओलांडून भारतीय साहित्याच्या विशाल अंगणात प्रवेश करेल,असे प्रतिपादन मांद्रे (गोवा) येथील ‘साहित्य संगम’चे कार्यवाह प्राचार्य गजानन मांद्रेकर केले.
आजगांव (सिंधुदुर्ग) येथील सुप्रसिध्द कवी विनय सौदागर यांच्या ‘सभोवताल’ या काव्यसंग्रहाचं प्रकाशन केल्यावर ते बोलत होते.
विनय सौदागर यांच्या निवासस्थानी आयोजित घरगुती कार्यक्रमात झालेल्या या प्रकाशन सोहळ्यास सुप्रसिद्ध कवी डॉ.सुधाकर ठाकूर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. ‘साहित्य संगम’ चे अध्यक्ष सुभाष शेटगांवकर हे अध्यक्षस्थानी होते.
मालवणी भाषा म्हणजे विनोदी लिखाण करण्याचीच भाषा हा समज विनय सौदागर यांच्या साहित्याने खोटा ठरवला असून, मालवणी भाषेत दर्जेदार स्वरुपाचे गंभीर व चिंतनशील लेखनही होऊ शकते,हे विनय सौदागर यानी आपल्या साहित्यातून दाखवून दिले आहे,असे डॉ.सुधाकर ठाकूर यानी यावेळी बोलताना सांगितले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना सुभाष शेटगांवकर यानी सौदागर यांच्या ‘सभोवताल’ मधील काही कवितांचे दाखले देत,दैनंदिन जीवनातील विषय त्यानी किती चिंतनशीलरित्या मांडलेले आहेत यासंबंधी विवेचन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कवी विनय सौदागर यानी प्रास्ताविक करून मान्यवरांचा परिचय केला,तर सौ.अनिता सौदागर यानी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले.
‘सभोवताल’ काव्यसंग्रहातील निवडक कवितांचे विनय सौदागर यानी यावेळी वाचन केले. शेवटी त्यानीच ऋणनिर्देश केला.
अनौपचारिक अशा या सोहळ्यास साहित्यिक डॉ.मधुकर घारपुरे, ८३ वर्षीय स्थानिक ज्येष्ठ नागरिक पांडुरंग झांटये,आजगांव हायस्कूलचे मुख्याध्यापक उत्तम भागीत,आजगांवचे माजी सरपंच रामचंद्र झांटये,कवी स्वप्नील वेंगुर्लेकर, तसेच साहित्यप्रेमी सचिन दळवी,सूर्यकांत आडारकर, सो.मीरा ठाकूर,एकनाथ शेटकर,चंद्रकांत गवंडी,प्रकाश वराडकर व प्रा.जयंत पाटील उपस्थित होते.