वैभववाडी
सजीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी पर्यावरणाचे त्याचबरोबर वनांचे संवर्धन आवश्यक आहे. सजीव सृष्टीचा -हास टाळण्यासाठी वन संवर्धनाचा संकल्प करून झाडे लावून झाडे जगवण्याची कृती केली पाहिजे असे प्रतिपादन सामाजिक वनीकरण वैभववाडीचे वनक्षेत्रपाल श्री. विनोद बेलवाडकर यांनी जागतिक वनदिन कार्यक्रमात केले.
महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात सामाजिक वनीकरण विभाग वैभववाडी, वैभव निसर्ग मंडळ आणि सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने २१ मार्च ‘जागतिक पर्यावरण दिन’ कार्यक्रम प्राचार्य डॉ.सी.एस. काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर सामाजिक वनीकरण वैभववाडीचे वनपाल श्री. प्रकाश पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे सचिव प्रा.श्री.एस.एन.पाटील, वैभववाडीचे वनरक्षक श्री.संदीप कुंभार, सौ.व्ही.बी. जाधव व वनमजूर श्री.टी.बी.ढवण व वैभव निसर्ग मंडळाचे अध्यक्ष प्रा.नंदू हेदुळकर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. बेलवाडकर बोलत होते.यावेळी त्यांनी २१ मार्च या ‘जागतिक वन दिना’चे महत्त्व, जागतिक पातळीवर केले जाणारे वनसंवर्धनाचे प्रयत्न व एकूणच पृथ्वीतलावरील सजीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी वनांचे संवर्धन ही काळाची गरज कशी आहे याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच प्रत्येकाने झाड लावून ते जगवले पाहिजे असे आवाहन केले.
जागतिक वन दिनाचे महत्त्व ओळखून जनजागृती बरोबरच प्रत्येकाने त्यासाठी कृती केली पाहिजे असे अध्यक्ष भाषणात प्राचार्य डॉ.सी.एस. काकडे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनपाल श्री.प्रकाश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.नंदू हेदुळकर यांनी व्यक्त केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्री.एस.एन. पाटील यांनी केले.