ओरोस:
जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांची पंचवार्षिक मुदत आज संपली. निवडणूक विभागाने नवीन सदस्य निवडीसाठी निवडणूक घेतलेली नाही. त्यामुळे निवडणूक विभागाच्या आदेशानुसार राज्याने जिल्हा परिषदेचा कारभार पुढील चार महिन्यांसाठी ‘सीईओ’ प्रजित नायर यांच्याकडे देत प्रशासक म्हणून नियुक्त केले आहे.
जिल्हा परिषदेवर २१ मार्च २०१७ ला विद्यमान सदस्यांची नियुक्ती झाली होती. नियमानुसार २१ मार्च २०२२ ला नवीन सदस्य निवडून येणे गरजेचे होते; परंतु कोरोना, शिवाय नवीन प्रभागरचना झाली नसल्याने विहित मुदतीत निवडणूक आयोगाने निवडणुका घेतल्या नाहीत. त्यामुळे नवीन सदस्य निवड झालेली नाही. विद्यमान सदस्यांना मुदतवाढही दिलेली नाही. यामुळे कारभार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हातात देत त्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती दिली आहे. जिल्हा परिषदेचा पूर्ण कारभार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे राहणार आहे.