संपादकीय…
नोकरी असो वा राजकीय क्षेत्र महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. परंतु पोलीस पाटील पदासाठी मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्वचितच महिला काम करताना दिसत आहेत. त्यातीलच एक म्हणजे रोणापाल गावातील निर्भिड महिला व्यक्तिमत्व निर्जरा परब. नोकरीच्या क्षेत्रात मोठमोठे पगार असतात, त्यामुळे काम करताना आव्हानात्मक असं काही असलं तरी महिला काम करताना दिसतात, परंतु पोलीस पाटील पद म्हणजे महिलांना काम करण्याच्या दृष्टीने हे एक आव्हानच आहे. सामाजिक जाणिवेतून पुढे येत निर्जरा परब यांनी गावातच नव्हे तर जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे एक नारी म्हणून अनेक संस्था, राजकीय पक्ष आदीनी त्यांचा सत्कार केला आहे.
राजकीय क्षेत्रात अनेक महिला सरपंच उपसरपंच तसेच मोठमोठ्या पदांवर देखील कार्यरत आहेत, परंतु बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती दिसते की, महिला आरक्षण म्हटल्यावर नावापुरत्याच महिला पदावर असतात आणि त्यांचे पद पतीदेव सांभाळत असतात. ग्रामपंचायत सरपंच महिला असली तर सरपंच पदाचा सर्व कारभार तिचा पती चालवतो अशीच परिस्थिती बऱ्याच ठिकाणी अनुभवायला मिळते. अगदी जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेच्या पदांवर महिलांचा कारभार हाकताना पतीच दिसत असतात. राजकीय क्षेत्रात अशी परिस्थिती आपण अनुभवत असतानाच रोणापाल सारख्या छोट्याशा गावात पोलीस पाटील निर्झरा परब यांनी आपल्या पदाला न्याय देत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पोलीस पाटील म्हणून काम करत असतानाच त्यांनी एल.एल.बी. चा अभ्यास देखील सुरू केला आहे. आपल्या गावातील जबाबदारीचे पोलीस पाटील पद सांभाळत असतानाच एल.एल.बी. अभ्यासक्रम पूर्ण करून वकील होण्याचाही बहुमान त्या काही दिवसात मिळवतील हे नक्की आहे. गावपातळीवरील भांडण-तंटे, वाद-विवाद, पोलीस प्रकरणे, कोर्ट कचेऱ्या आदी सर्व विषय सामाजिक भावनेतून सामंजस्याने मिटविण्याची तसेच अकाली दुर्घटना झाली तरी त्याची तात्काळ खबर देण्याची जबाबदारी ही गावच्या पोलीस पाटीलांवर असते. अशी एक ना अनेक दिव्य पार करत निर्जरा परब यांनी महिलांसमोर देखील आदर्श घालून दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर महिलांनी देखील सामाजिक जाणिवेतून अशाच प्रकारे पुढे येऊन आव्हान पेलले पाहिजे, तरच निर्जरा परब यांनी केलेल्या कामाचे चीज होईल.