वेंगुर्ले
महिला काथ्या कामगार औद्योगिक सह. संस्थेची पंचवार्षिक निवडणुक सहकार खात्याचे अधिकारी श्री. कावले यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या कार्यालयात पार पडली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. माधवी गावडे व व्यवस्थापकीय संचालिका सौ. प्रज्ञा परब असुन, संचालक मंडळ म्हणून श्रीम. लिला कृष्णा परब, श्रीम. सोनाली साळगावकर, श्रीम. श्रुती रेडकर, श्रीम, अनुराधा परब, श्रीम, रंजना कदम, श्रीम. प्रविणा खानोलकर, श्रीम. रक्षिता रो. गोवेकर, व श्रीम. छाया भाईप यांची संचालक म्हणून निवड करण्यात आली. जास्तीत जास्त लोकांना काथ्या उद्योगाच्या माध्यमातुन रोजगार उपलब्ध करुन देताना रत्नागिरी जिल्ह्यातही काथ्या उद्योगासाठी प्रयत्न करणार असल्याचे चेअरमन सौ. माधवी गावडे यांनी सांगितले.
गेली १५ वर्षे संचालक म्हणून सौ. गावडे संस्थेत कार्यरत आहेत. महिला काथ्या कामगार औद्यो सह. संस्था ही सौ. प्रज्ञाताई परब व कै. सुवर्णलता नवार यांच्या पुढाकाराने स्थापन झाली. सन १९८८ मध्ये स्थापन झालेली संस्था २००७ पर्यंत शिरोडकर कंपाऊंड येथे भाड्याच्या जागेत सुरू होती. २००७ साली सौ. प्रज्ञाताई व तत्कालिन संचालक मंडळ यांनी ३ एकर जागा विकत घेवुन स्वतःचा प्रकल्प उभा केला. सिंधुदूर्ग जिल्हा तसेच महाराष्ट्र राज्यातही काथ्या उद्योगाची मुहूर्तमेढ महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था मर्या., वेंगुर्ला या संस्थेने रोवली. राज्य व केंद्रशासन स्तरावर प्रयत्न करुन काथ्या उद्योगाला उर्जितावस्था आणली. आजपर्यंत हजारो महिलांना काथ्याचं प्रशिक्षण या संस्थेमार्फत दिले गेले व अजूनही देत आहोत. आता राज्यशासना बरोबरच केंद्रशासनही काथ्या उद्योग वाढीसाठी खुपच मदत करीत आहे.