You are currently viewing १५ मार्च- “जागतिक ग्राहक हक्क दिन” सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा करावा.

१५ मार्च- “जागतिक ग्राहक हक्क दिन” सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा करावा.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

वैभववाडी

१५ मार्च हा दिवस “जागतिक ग्राहक हक्क दिन” म्हणून साजरा केला जातो. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये हा दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात यावा, अशी विनंती ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे.
भारतात २४ डिसेंबर हा “राष्ट्रीय ग्राहक दिन” आणि १५ मार्च हा “जागतिक ग्राहक हक्क दिन” म्हणून साजरा केला जातो. सदर दोन्ही ग्राहक दिन काही शासकीय कार्यालय पातळीवर सोपस्कर म्हणून साजरे केले जातात, ही वस्तुस्थिती आहे.
१५ मार्च, १९६२ रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी अमेरिकेच्या पार्लमेंटमध्ये ग्राहकांच्या अधिकारावर एक भाषण करुन ग्राहक हक्काचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. तेव्हापासून १५ मार्च हा दिवस “जागतिक ग्राहक हक्क दिन” म्हणून साजरा केला जातो.
संपूर्ण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या ग्राहक राजा जागृत व्हावा, त्याचे संघटन व्हावे, त्याला आपल्या हक्क, अधिकार आणि कर्तव्याची जाणीव व्हावी, त्याची फसवणूक होऊ नये, ग्राहक चळवळ व ग्राहक चळवळ संबंधित संस्था तसेच शासनाच्या विविध योजना, ग्राहक संरक्षण कायदा व ग्राहक न्यायालये याबाबत माहिती व्हावी, या उद्देशाने हे दिवस साजरे केले जातात. खऱ्या अर्थाने ग्राहक जागृती व प्रबोधन होण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये ग्राहक जागृतीपर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, जनजागृती रॅली, व्याख्यान, चित्रफित, पथनाट्य, घोषवाक्य व गीत गायन इ. कार्यक्रमांपैकी काही कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात यावा अशा प्रकारच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिल्या गेल्यास हा दिवस साजरा होण्यास मदत होईल.
भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते, ग्राहक पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष ग्राहकतीर्थ स्व.बिदुमाधव जोशी स्थापित “ग्राहक पंचायत महाराष्ट्र” ही संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रातील पंचवीस जिल्ह्यांमध्ये ग्राहक जागृतीचे पवित्र कार्य करीत आहे. ग्राहकांचे संघटन, प्रबोधन व मार्गदर्शन तसेच प्रशासनाचा सहकारी म्हणून संस्था कार्य करीत आहे.
या दिनाच्या निमित्ताने ग्राहकांच्या हक्काचा जागर होण्यासाठी १५ मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन सर्वत्र साजरा करण्यात यावा, असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाध्यक्ष व राज्य सदस्य प्रा.श्री.एस.एन. पाटील, उपाध्यक्ष श्री.एकनाथ गावडे, संघटक श्री. सिताराम उर्फ दादा कुडतरकर, सचिव श्री.संदेश तुळसणकर, महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री. तेजस साळुंके व संघटक श्री. जितेंद्र पिसे यांनी केली आहे.
सदर मेलची प्रत मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, ग्राहक संरक्षणमंत्री, निवासी उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, जिल्हा पुरवठा अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सिंधुदुर्ग, पोलीस अधिक्षक सिंधुदुर्ग, जिल्हा माहिती अधिकारी व अध्यक्ष, ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांना पाठविण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा