अजय गोंदावळे व बंटी पुरोहित ही दोनच नावे का आहेत चर्चेत?
सावंतवाडी नगरपालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यात होण्याची शक्यता आहे.डिसेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला या नगरपालिका बरखास्त करून त्यावर प्रशासक नेमण्यात आले. राज्यातील मुदत संपलेल्या सर्व नगरपालिका आणि महानगरपालिका बरखास्त करून लवकरच निवडणुका घेण्यात येतील असे घोषित करण्यात आले होते, परंतु मध्यंतरी आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या, त्याच बरोबर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाल्यामुळे भविष्यातही या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता आहे.
सावंतवाडी नगरपालिकेची निवडणूक पुढे गेली तरीही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात बंटी पुरोहित हे नवे नेतृत्व उदयास आले आहे. सावंतवाडी नगरपालिकेवर गेली दोन वर्ष भाजपची सत्ता होती. सत्ता आल्याच्या नंतर सावंतवाडी शहरात अनुभवी लोकप्रतिनिधी तसेच मूळ भाजपचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी हे बाजूलाच राहिले व सावंतवाडी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या जवळचे मानले जाणारे अजय गोंदावळे व बंटी पुरोहित ही दोन नावे प्रामुख्याने सावंतवाडी शहरातील राजकारणात घेतली जाऊ लागली. संजू परब यांचे मित्र अजय गोंदावळे यांच्याकडे सावंतवाडी शहराचे भाजपा मंडल अध्यक्ष म्हणून शहराची धुरा सोपविण्यात आली. अजय गोंदावळे यांना मिळालेल्या पदाचा सदुपयोग करत अनेक वेळा पत्रकार परिषदा घेऊन व पक्षीय कार्यक्रम राबवत त्यांनी आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु अलीकडेच गेल्या काही दिवसांपासून सावंतवाडी शहराच्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजू परब यांचे जवळचे मानले जाणारे भाजपा कार्यकर्ते बंटी पुरोहित हे नवे नेतृत्व उदयास येत असल्याचे दिसून आले आहे. भारतीय जनता पक्षाने बंटी पुरोहित यांच्यावर भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदाची धुरा सोपविल्यानंतर बंटी पुरोहित यांनी मागे वळून न पाहता पक्षाच्या कामासाठी झोकून दिले आहे. माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी भाजपा पक्ष प्रवक्ते असूनही जेवढा समाचार विरोधकांचा घेतला नाही तेवढा समाचार सावंतवाडी नगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर झाल्याबरोबर बंटी पुरोहित यांनी घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या पुणे जिल्हा अर्बन बँकेच्या उपाध्यक्षा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा सौ.अर्चना घारे-परब यांच्या स्वबळावर सावंतवाडी नगरपालिका लढण्याच्या घोषणेवर टीकास्त्र सोडताना बंटी पुरोहितांनी राष्ट्रवादीकडे २० उमेदवार तरी आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे भाजपाचे माजी नगरसेवक व इतर लोकप्रतिनिधी आदींच्या देखील भुवया उंचावल्या आहेत.
संजू परब यांचे जवळचे म्हणून बंटी पुरोहित, अजय गोंदावळे यांच्याकडे पक्षाने दिलेली जबाबदारी पाहता गेल्या दोन वर्षात हीच दोन नावेच का चर्चेत येत आहेत? असा सवाल केवळ सावंतवाडीकर जनताच नव्हे तर भाजपाचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित करत आहेत. त्यामुळे सावंतवाडी शहरात अजय गोंदावळे, बंटी पुरोहित या दोन नावांना मिळालेली पक्षाची पसंती, त्यांना मिळालेली पदे हा सर्वांसाठीच संशोधनाचा विषय बनला आहे, असे स्वकीय देखील खासगीत सांगतात. याच दोन नावांना पदे मिळण्याचे नक्की कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सावंतवाडी शहरात व्यापारासाठी येऊन स्थायिक झालेल्या व्यक्तींकडे सावंतवाडी शहराची धुरा सोपविताना मूळ भाजपा तसेच अनुभवी लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक आदींना का डावलले जात आहे? असा प्रश्न स्वकीयच विचारत आहेत. भारतीय जनता पक्षाने गेल्या दोन वर्षात या दोन नावांना दिलेला पाठिंबा पाहता भविष्यात यातूनच कोणीतरी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असेल की काय? अशीही शंका वाटू लागली आहे.