जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी मुबारक उमराणी यांची अप्रतिम काव्यरचना
दिवसभरच्या
शेतातल्या कामात
त्याला दोन घास
खायची सुद नव्हती
डोईवर वैरणीचा भारा
दावणीच्या छप्परात
टाकला.
फाटक्या टाॅवेलने
घामाचे थेंब पुसत
घरात पाय ठेवताच
आईला शिदोरीचे
गाठोडे दिसले.
क्षणात आई उसळून म्हणाली,
“माझ्या हातचे कशाला खाचीला
शेळ्याची लेंडी घालून
भाकरी थापली नव्हं म्या.
खाचीला म्हणून उसळ केलीती
हात लावचीला तर शपथ,
नशिब माझं माझ्या बाबानं
तुमचं लोढणं बांधल
माझ्या गळ्यात ,
आईच्या तोंडाची गिरणी
काय केल्या गप्प होईना
आम्ही सारं भयभीत
गल्लीतल्या बाया तमाशा
बघत होत्या.
” बा ” शांत विठ्ठला सारखे
उभे होते.
मी भीत भीत आईला म्हणालो,
” बा मारलं तुला. ”
आई म्हणाली,” तसा तुझा “बा ”
मारायचा नाही त्यांच हात
सासूबाईनं बांधल्यात
वचनाच्या रस्सीने.”
” बा ” स्थितप्रज्ञ.
आम्ही सारे आजीच्या
तसबीरपुढे नतमस्तक
हात पुढे करत.
” कोणत्याही स्थितीत
स्त्रीवर हात न उगारण्याची
शपथ घेण्यासाठी.
© मुबारक उमराणी
सांगली
९७६६०८१०९७.