स्वाभिमान ट्रस्ट मार्फत दोन्ही डोळ्यांवर झाली मोफत शस्त्रक्रिया
आरिफ बगदादी पुन्हा ठरले देवदूत
सिंधुदुर्ग
शरीराची पेंचेंद्रिये सुस्थितीत असतील तर जगणं सुसह्य होतं. या पंचेंद्रियांपैकी एखादा अवयव जरी योग्यरितीने काम करत नसेल तर खूप यातना सहन कराव्या लागतात. देवगड तालुक्यातील सौंदाळे (ताम्हणकरवाडी) येथील अनंत गंगाराम डोंगरकर यांच्याही नशिबी असेच यातनामय जीवन आले होते. डोळ्यांचे दोन्ही पडदे खराब झाल्याने दिसायचं पूर्णपणे बंद झालेलं. आयुष्यभर जमा केलेली पुंजी जरी खर्च केली तरी वैद्यकीय उपचार होणं अशक्य. त्यामुळे भविष्याबाबतही अंधार साचला होता. अशा कठीण वेळी पुन्हा एकदा धावून आलं ते आमदार नितेश राणे यांचं स्वाभिमान ट्रस्ट. या ट्रस्ट मार्फत अनंत गावकर यांच्यावर लाखो रुपयांचे योग्य ते उपचार होऊ शकले अन् तेही अगदी मोफत. या साऱ्याच्या मागे कष्ट आहेत ते भाजपा जिल्हा सरचिटणीस आरिफ बगदादी यांचे. ज्याप्रमाणे आपल्या लोकाभिमुख कार्यामुळे आणि तत्परतेमुळे आरिफ बगदादी यांनी कित्येकांच्या पडत्या काळात त्यांना साथ देत त्यांच्या आजारावर स्वाभिमान ट्रस्ट मार्फत मोफत उपचार करून त्यांना पुनर्जन्म मिळवून दिला त्याचप्रमाणे अनंत डोंगरकर यांनाही निस्वार्थी भावनेने मदत करून त्यांच्या आयुष्यात पुन्हा नवा उजेड आणला आहे.
डोळ्यांचे दोन्ही पडदे खराब झाल्याने अंधत्वाचे जीवन जगत असलेल्या अनंत डोंगरकर यांचा आरिफ बगदादी यांच्याशी संपर्क झाला आणि जगण्याची नवी उमेद त्यांना मिळाली. अत्यंत गरीबीत आयुष्य कंठत असलेल्या डोंगरकर यांना वैद्यकीय उपचारासाठी येणारा खर्च पेलवणारा नव्हता. ही स्थिती लक्षात येताच आरिफ बगदादी यांनी आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमान ट्रस्ट मार्फत त्यांना वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे मुंबई येथील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये डोंगरकर यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी साधारण दीड लाख रुपये खर्च आला. परंतु स्वाभिमान ट्रस्ट मार्फत ही शस्त्रक्रिया अगदी मोफत पार पडली. जावेद खान आणि फैमीदा मॅडम यांनी स्वाभिमान ट्रस्ट मार्फत ही शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. शस्त्रक्रियेनंतर मला खूप चांगला फरक जाणवत आहे. दोन महिन्यांनंतर मला चांगलं दिसू लागेल, असं डॉक्टर म्हणाले आहेत. ही नवी दृष्टी येण्यामागे आमदार नितेश राणे आणि आरिफ बगदादी यांचे मोलाचे सहकार्य आहे. हे मी कधीच विसरू शकणार नाही, अशा शब्दांत अनंत डोंगरकर यांनी शस्त्रक्रियेनंतर आपल्या भावना मांडल्या.
भाजपा जिल्हा सरचिटणीस आरिफ बगदादी हे आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमान ट्रस्ट मार्फत करत असलेले काम लाखमोलाचे आहे. आतापर्यंत त्यांनी बायपास सर्जरी, कँसर, कंबरेची, गुडघ्याची शस्त्रक्रिया अशा अनेक आजारांनी त्रस्त असलेल्यांना स्वाभिमान ट्रस्ट मार्फत पुनर्जन्मच मिळवून दिला आहे. अनंत डोंगरकर यांच्यावरील शस्त्रक्रियेसाठी सातत्याने पाठपुरावा करत आणि स्वाभिमान ट्रस्ट मार्फत त्यांची शस्त्रक्रिया अगदी मोफत आणि यशस्वी करत डोंगरकर यांच्या अंधारलेल्या जीवनात त्यांनी पुन्हा आशेचा आणि स्वाभिमानाने जगण्याचा प्रकाश पेरला आहे.