८ तारखेला नव्या कार्यालयाचे उद्घाटन; मोफत विविध कोर्सचे प्रशिक्षण देणार…
सावंतवाडी
गेली अनेक वर्षे जिल्ह्यात कॉम्प्युटरचे प्रशिक्षण देणाऱ्या एस.एस.आय कम्प्युटर्स या संस्थे अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्राला “फाईव्ह स्टार”चा दर्जा मिळाला आहे. या निमित्ताने संस्थेकडून केंद्र शासनाची मान्यता असलेले डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर, अकाऊंट एक्झिक्युटिव्ह आणि स्ट्रीट फुड वेंडर हे प्रशिक्षण कोर्स मोफत शिकवले जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे संचालक रघुनाथ तानावडे यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या नव्या केंद्राचे उद्घाटन ८ तारखेला सायंकाळी ४ वाजता निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांच्या हस्ते होणार आहे. आता या संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात अन्य आठ केंद्रांवर हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा कौशल्य विकास विभागचे नामदेव सावंत, एकनाथ पाटील उपस्थित होते.
श्री तानावडे म्हणाले, आतापर्यंत एस एस आय कॉम्प्युटर्समध्ये प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी देशात तसेच विदेशात चांगल्या पदावर नोकरीला आहेत. उत्तम दर्जाचे प्रशिक्षण देत असल्यामुळे या संस्थेला प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्राची मान्यता मिळाली आहे. तर फाईव्ह स्टार रेटिंग सुद्धा मिळवणारी या क्षेत्रातील एकमेव संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून गरीब व गरजू तसेच होतकरू विद्यार्थ्यांना डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर, अकाऊंट एक्झिक्युटिव्ह आणि स्ट्रीट फूड व्हेंडर हे प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. त्यामुळे इच्छुक लाभार्थ्यांनी संस्थेच्या कार्यालयात संपर्क करून या संधीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
ते पुढे म्हणाले, सावंतवाडी येथील एस.एस. आय.कॉम्प्युटर्सचे नवीन वास्तूचे स्थलांतर व प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी दत्ता भडकवाड यांच्या हस्ते ८ मार्चला सायंकाळी चार वाजता होणार आहे.यावेळी माजी मुख्याध्यापक विजयप्रकाश आकेरकर, ए. एस. पी. एम. कॉलेज, सांगूळवाडी, वैभववाडीचे सचिव संदीप धोंडू पाटील, गुरुवर्य वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठान, शिरोडाचे अध्यक्ष सी.जी. ओतवाणेकर, एम. आय.टी.एम. कॉलेज, सुकळवाडचे प्राचार्य सुर्यकांत नवले, व्हा. चेअरमन, कॅम्प एजुकेशन सोसा. पुण्याचे अण्णासाहेब भोसले हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती श्री तानावडे यांनी यावेळी दिली.