जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ शोभा वागळे यांनी कवयित्री सुनंदा पाटील आणि कवी प्रसाद कुलकर्णी यांच्या गझल संग्रहाचे केलेले परीक्षण:-
मराठी साहित्यात आणि तेही गझलेतल्या क्षेत्रातला पहिल्यांदाच प्रकाशित झालेला प्रेम विषयावरील मुसलसल गझल संग्रह म्हणजेच ‘गझल प्रेमऋतूची ‘ गझलकारा, प्रा.सुंनदाताई पाटील व श्री . प्रसाद कुलकर्णी यांचा एकत्रित असलेल्या शंभर गझलांचा संग्रह आहे.
ख्यातनाम उर्दू शायर मिर्झा गालिब यांच्या २२५ व्या जन्म वर्षाचे औचित्य साधून, सोमवार, २७ डिसेंबर २०२१ रोजी हा संग्रह ‘ जिनियस ऑफ गालिब ‘ या संस्थेच्या विशेष कार्यक्रमात प्रकाशित करण्यात आला. ह्या संग्रहाचे प्रकाशक स्वतः प्रसाद कुलकर्णी आहेत. हा संग्रह आदरणीय भट साहेबांना अर्पण केलाय. गझलनंदा आणि प्रसाद दोघेही स्व. भट सर (दादा) यांचेच शिष्य!
प्रा. सुनंदा पाटील म्हणजेच गझलनंदा १९७९ पासून गझल विश्वात रमल्या होत्या. सुरेश भटांकडे गझलेचे शिक्षण घेतलेल्या जेष्ठ गझलकारा महाराष्ट्राच्या अति पूर्वेच्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शीच्या आहेत.
अवघ्या महाराष्ट्राला ज्ञात असलेले, हजारो लेख, भाषणे, गझल या प्रांतात मुशाफिरी करणारे सामाजिक कार्यकर्ते आणि जेष्ठ गझलकार प्रसाद कुलकर्णी हे कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील आहेत. दोघेही गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती सुरेश भटसाहेबांकडे १९८५ साली भेटले व दोघेही गझलची मुळाक्षरे अभ्यासू लागले व तो प्रवास अजूनही चालला आहे.
संग्रहाचे मुखपृष्ठच अतिशय आकर्षक असून प्रेम रंगाने भरलेले आहे. दोघांनी लिहिलेली आतील प्रस्तावना व मनोगत लक्षवेधी आहे.
संग्रहात एकूण शंभर गझला असून सम आणि विषम अंकाने विभाजित केल्या आहेत. विषम नंबर गझलनंदाजींचा आणि सम नंबर प्रसादजींचा आहे. दोघांच्या ५०/५० गझला मुसलसल प्रेम विषयावर असून प्रेमाच्या विविध छटांनी शेर सजलेले आहेत. त्यामुळे हा संग्रह तरूणांना तर आकर्षित करतोच पण वयस्कर तरूण मनांना ही तितकाच प्रिय वाटेल यात शंकाच नाही.
ह्या संग्रहाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, अतिशय निर्दोष मराठी गझल लिहिणाऱ्या ‘गझलनंदा’ म्हणजेच प्रा.सुंनदा पाटील यांनी लिहिलेला *मराठी गझल : स्वयंअध्ययनाची अंकलिपी.* ह्या प्रदीर्घ लेखात सुनंदाताईंनी गझल म्हणजे काय? वृत्त आणि आकृती बंध- लगावली – वृत्त, शब्द-जोडाक्षरे – मतला, शेर कफिया – रदीफ, मक्ता हे सगळे सविस्तर नवोदितांना समजण्यासाठी *गझल प्रेमऋतू* संग्रहात सुबोध भाषेने लिहिले आहे. यामुळे नवीनच गझल लिहू लागलेल्यांना अतिशय मार्गदर्शक ठरणारा असा हा उपयुक्त संग्रह आहे. भट साहेबांच्या बाराखडी नंतर असा प्रयोग करणे हेही या गझल संग्रहाचे वैशिष्ट्य आहे. भट सर सुनंदाताईंना आपली मुलगीच मानत होते व ताई ही स्वतः त्यांची मुलगी म्हणवतात.
संग्रहाचे नावच *गझल प्रेम ऋतूची* म्हणजे प्रेम रसाने ओतप्रोत भरलेले एक से बढकर एक अशा शेरांच्या गझला आहेत.
संग्रहातली पहिलीच गझल आणि तिचा मतला बघा
*द्वेष पसरत्या विश्वामध्ये प्रेमाचाही ऋतू असावा*
*गझले तुझिया शेरामध्ये प्रेमाचाही ऋतू असावा*
प्रसाद सरांच्या ह्या मतल्यास ताई गझल प्रेमऋतूची मध्ये लिहिते
*प्रेमऋतूची अधरावरती गझल लिहावी*
*ओठाने तू गझल नव्याने वाचत जावी*
असे तोडीस तोड देणाऱ्या शेरांनी सजलेल्या गझला वाचता वाचता वाचतच जावे असे वाटते.
आता निसर्गातही प्रेम बघावे
*सूरलयीने,आलापाने साद घालतो*
*होत रागिणी, गात मारवा, श्रावण हिरवा..*
हुबेहूब चित्र नजरेत आलं की नाही श्रावण ऋतूतलं!
तसा ताईंचा शेर
*मिठीत होती अधीरता अन् दिठीत होता साजण*
*सायंकाळी भुरभुरणारा ढगात आला श्रावण*
वाह वाह! रिमझिमणारा पर्जन्य अन् साजणाच्या संगतीतली ती संध्या!
‘पहाट फुलते’ ह्यात ताईंचा शेर:-
*चैत्रवनाची चाहूल येते सायंकाळी*
*कोकिळकूजन ओठांवरती मग कुजबुजते*
प्रत्येक ऋतूतले ओतप्रोत प्रेमाने भरलेले असे शेर आहेत.
अशा शंभर गझलांचा संग्रह म्हणजे जणू अलिबाबाची गुहाच!
मग वेळ दवडू नका. संग्रह घेऊन, वाचून, आनंद लुटा.
ह्या संग्रहास एका महिन्यात दोन सर्वोत्कृष्ट पुरस्कार लाभले आहेत. ह्यावरून संग्रह ‘गजल प्रेमऋतूची’च्या श्रेष्ठतेचा अंदाज आलाच असेल! चला तर, लगेच खरेदी करा आणि गझल प्रेमऋतूत न्हाऊन घ्या.
संग्रहाचे नाव :- गझल प्रेमऋतूची
गझलकार :- गझलनंदा / प्रसाद कुलकर्णी
पृष्ठे :- १४०
मूल्य :- ₹१७५ /-
परीक्षण :- शोभा वागळे, मुंबई (8850466717)
संग्रहासाठी संपर्क :- प्रा. सुनंदा पाटील (8422089666)
प्रसाद कुलकर्णी :- (9850830290)