*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कारित ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांची काव्यरचना*
*हृदय सखे तू गुंतवले ….*
कुंतल काळ्या बटात माझे हृदय सखे तू गुंतवले
गालावरती येता बट ती … मला कसे मी आवरले …
गाल गुलाबी कुंदकळ्या त्या
दंतपंक्ती त्या हसतांना
हळूच वाटे लावावा ग, हात
तुझ्या त्या गालांना…
मोहरलेला आम्र तरू तू मोर नाचतो तरू तळी
सांग कशी मी विसरू तुझ्या ती गालावर ची नाजुक खळी …
काजळ काळे भरून डोळे
हरिणाक्षी तू तिलोत्तमा
वाऱ्यावरती पदर लहरे
क्षणभर भासे जणू रमा…
खानदानी युवती कोणी नजर लावूनी पायतळी
बघता बघता तुझ्याकडे ग नजर होतसे माझी खुळी….
हटत नाही नजर बाई ग
यौवन सारे मुसमुसते
पाऊल पडता भुईवरी तू
हृदय का मम कुस्करते …
प्रेम पुजारी आहे तुझा मी करतो लांबूनच पुजा
फळफळेल ग नशिब कुणाचे कोण होईल राजा तुझा …
सुखी तू व्हावी हेच चिंतितो नजर न लागो दुष्टाची
रूपसुंदरी नमन तुला ग राणी शोभते इष्काची …
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : २० फेब्रुवारी २०२२
वेळ : संध्या ७ : ०४