*माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांची भरगच्च पत्रकार परिषद*
सावंतवाडी :
नव्या दिशेने सिंधुदुर्ग ची वाटचाल आता सुरू होणार आहे, बलशाली सिंधुदुर्ग उभा करणार, असा विश्वास सिंधुदुर्गचे माजी पालकमंत्री विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी शनिवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
मंत्री असताना दहा अब्ज आलेला निधी प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे परत गेला,याचे शल्य आहे. पण आता आमदार या नात्याने तसं होऊ देणार नाही. आपण एकमेव गृहराज्यमंत्री आहे जो आमदार म्हणून पुन्हा निवडून आला. गृह राज्यमंत्री म्हणून काम करणारा आमदार पुन्हा निवडून येत नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. असेही ते म्हणाले.
सावंतवाडी शहरातील श्रीधर अपार्टमेंट येथील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार केसरकर बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी होते.
आमदार केसरकर म्हणाले, माझी मतदार संघातील जनतेशी नाळ जुळलेली आहे. गृह राज्यमंत्री असताना मतदारसंघाला मी वेळ देऊ शकलो नाही. राज्यभर फिरावं लागलं. मंत्रीपदावर असताना निधी आणला. मात्र प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे विकास काम पूर्ण होऊ शकली नाहीत. निधी परत गेला. मंत्रिपदावर असल्याने लोकांना भेटू शकलो नाही. त्यामुळे नाराजी होती. आता पूर्णवेळ मतदारसंघाला वेळ देता येईल. सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीआधीच शहराचा कायापालट पाहायला मिळेल. निवडणूक काळात शहरात तळ ठोकून राहिन, सावंतवाडी शहर हे माझे घर आहे. विस्कटलेले कुटुंब पुन्हा उभे करेन असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार केसरकर यांनी मतदारसंघातील रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी मंजूर झालेल्या निधीचा तपशीलही दिला.