प्रविण गवस यांच्या उपोषणाला यश : सावंतवाडी विजघर एसटी सेवा सुरू
चालक वाहकांचे सामाजिक कार्यकर्त्यांकडून स्वागत
दोडामार्ग
सावंतवाडी दोडामार्ग वीजघर या मार्गावर सुरु केलेल्या एसटी गाडीच्या चालक आणि वाहकाचे येथील बस स्थानकावर स्वागत करण्यात आले. प्रवाशांच्या सोयीसाठी दोडामार्ग वीजघर मार्गावर बसफेरी सुरु करावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गवस यांनी दोडामार्ग बसस्थानक आवारात उपोषण केले होते. त्यांना विविध सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला होता. विभाग नियंत्रक, वाहतूक निरीक्षक, आगार व्यवस्थापक आदींनी त्यांच्यासोबत चर्चा केली होती. त्या चर्चेत दोडामार्ग वीजघर मार्गावरील शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी दिव्यांग, रुग्ण यांच्यासाठी किमान एक गाडी सुरु करावी, अशी मागणी केली होती. त्यावेळी चालक – वाहक उपलब्ध होताच दोडामार्गला प्राधान्य देण्याचे लेखी आश्वासन त्यांनी दोडामार्ग – वीजघर मार्गावर सुरू केलेल्या एसटीच्या चालक – वाहकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रायोगिक तत्वावर मंगळवारपासून ( ता . २२ ) एसटी सुरू करण्यात आली. सकाळच्या बसफेरीची नियोजित वेळ अशी सकाळी ७ वाजता सावंतवाडीतून सुटणार, ९ .१५ पर्यंत वीजघरला पोचणार, ९ .३० वाजता वीजघर वरून सुटणार आहे. १०.३० पर्यंत दोड़ामार्गला पोचणार . सध्या ही फेरी सुरु नाही . ती शनिवारच्या दरम्यान सुरु होणार आहे . सध्या सुरू असलेल्या बस फेरीची वेळ अशी सकाळी ११ वाजता ती सावंतवाडीतून सुटते . १२.३० ला दौडामार्गवरून वीजघरला जाते . १.३० पर्यंत वीजघरला पोचते . १.४५ ला वीजघरवरून दोडामार्ग व तेथून सावंतवाडीला जाते . दोडामार्ग मार्गावर अशा दोन फेऱ्या सुरु राहणार आहेत . त्या फेऱ्यांचा १५ दिवसांचा आढावा घेऊन भारमान चांगले राहिल्यास फेऱ्या कायम करण्यात येतील; मात्र प्रवासी न मिळाल्यास त्या फेऱ्या स्थगित करण्यात येतील, असे पत्रही सावंतवाडी आगार व्यवस्थापकांकडून दिले आहे . प्रवीण गवस, श्रीकृष्ण गवस, शैलेश दळवी, प्रदीप गावडे, पिंकी कवठणकर, शिवदास मणेरीकर, बंटी मोरजकर उपस्थित होते.