जागतिक साहीत्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सायली देशपांडे यांनी मनाशी साधलेला संवाद
माझा मनाशी संवाद
हे मना
*मोरपीशी आठवणी घेऊनी आलास तू*
*तुला भेटण्याला झाले अधीर मी*
*भावनेत चिंब भिजू दे रे जरासे*
*तुझ्या विविध रूपात होईन एकरूप मी..*
खरं खरं सांग मना…
कधी हळव्या कोपऱ्यात तर कधी चिडक्या कोपऱ्यात, कधी इथे तर कधी दूर दूर..
कसं जमतं रे असं भटकायला तुला…
भूतकाळात रमतोस नी भविष्य बघून येतोस.
वर्तमानात कधीतरीच फिरकतोस…
उंच उंच विहार करायला.. मनसोक्त बागडायला..
निळ्या नभाची चादर लपेटून सहज आत डोकवायला कसं रे जमतं तुला..
शामरंग लेवून शांत बसणं जाणतोस..
नयन डोहासवे मनसोक्त भांडतोस..
गूढ,गंभीर, सखे तुझे..
चंचलतेशी सख्य खूप
गहिऱ्या तळास जाऊनी जरा
शोधतोस स्वतः
चेच रूप..
भेट घे जरा कधी..
होउदे उलगडा..
सांधूनी घे सोबतीस..
मंद सुखद झुळूक जरा..
सवे जरासा मोगराही असुदे.
गंधित होईल परिसर सारा.
अस्ताव्यस्त पसरलेला सगळळा दुःखद काळ गोळा कर..
तिथे सुखद घटनांना भर
गिरकी घे जराशी छान
नी मधुरनाद सोबतीस बांध
मोरपीस फिरूदे रोमरोमावर
मनसोक्त होऊदे हसरा वावर.
खर सांग ना मना..
भेटशील का असा
घट्टमिठीत विरघळून एकरूप होणं अनुभवायचय ..
भेट घडू दे अशीच अपुली..
सुखाची पायघडी मी तुझ्यासाठी अंथरली..
मऊ,मुलायम,अलवार पायघड्यांवर असे भेटलो होतो एकदा, आठवते का तुला, मोगऱ्याची फुलं ओंजळीतून अलगद ओंजळीत भरताना, खट्याळ झुळूक छेडून गेली, तुझ्या लटक्या रागाची तार छेडून, गोड हसलेली ती सुरेख आठवण अलगद उघडून दाखवताना मयूरासम रोमरोम खुलले..
मना.. मन इथेच गुंतले.
चल..
*गुफुंनी हाती हात..*
*दुसऱ्या मनालाही घालू आर्त साद..*
*घेऊ उंचच उंच भरारी*
*जपू दुसऱ्या तळाचीही पायरी*
*©️®️ सौ. सायली सुहास देशपांडे*
अहमदनगर
📱9420953924
20/2/22