“एमएसएमई उद्योजकता विकास कार्यक्रम”
२४ फेब्रुवारीला कोकणातील प्रसिद्ध अशा आंगणेवाडी यात्रेचा माहोल सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. त्याचवेळी… अगदी दुसऱ्याच दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भरत असलेल्या एका महा-उद्योगयात्रेचे महत्वदेखील फार मोठे आहे. देवीच्या गाऱ्हाण्यात ज्या भरभराटीचे मागणे केले जाते, त्या भरभराटीसाठीच या उद्योगयात्रेचे आयोजन आहे. कोकण म्हणजे गरिबी.. दारिद्र्य … हे चित्र आता बरेचसे बदलत चालले आहे. पण अजूनही कोकण म्हणजे “निव्वळ ऐश्वर्य” हे चित्र तयार झालेले नाही. कोकणचे सुपुत्र मा.नारायणराव राणे यांच्या संकल्पनेतून एमएसएमई मंत्रालयाच्या माध्यमातून २५ व २६ फेब्रुवारीला सिंधूदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा एक गरजेचा मेळावा.… *एमएसएमई उद्योजकता विकास कार्यक्रम* होत आहे. राजकारणापलीकडे जात आता सर्वांनीच स्व-विकासाकडे… प्रगतीकडे… प्रचंड श्रीमंतीकडे झेप घेण्याची गरज आहे. आणि हे खरोखरच शक्य आहे का? हे स्वतः पुढे होऊन शोधायला हवे!
जो झोपला असेल त्याने आता जागायला हवे, जागा असेल त्याने उठायला हवे.… उठलेल्याने चालायला हवे आणि चालायला सुरुवात केलेल्यांनी आता जोरदारपणे दौडायला हवे. बेरोजगार युवावर्गापासून ते प्रथितयश उद्योजकापर्यंत सर्वांना सोबत घेऊन जाणारे हे कोकण विकासाचे खरेखुरे अभियान आहे. या शाश्वत विकासासाठी ना.नारायणराव राणे आपल्या मंत्रीपदाचा होता होईल तेवढा उपयोग करून द्यायला तयार आहेत. पण आपणच जर या संधीचा उपयोग करून घेणार नसलो, त्यातही जर का राजकारण आणणार असलो, तर ते आपल्यासकट आपल्या जिल्ह्याचे दुर्दैव म्हणावे लागेल. विकासाची गंगा दारापर्यंत आली असता त्यात राजकारण शोधत बसून डुबकी न मारण्याचा कर्मदरिद्रीपण करू नका एवढंच परत परत सांगावंसं वाटतं. ‘देव देता नी देवचार नेता…”अशी म्हण कोकणला जुनी नाही. पण तरीही… यावेळी ती जुनी करत विस्मृतीत नेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत!!
*…..”काय आहे हा कार्यक्रम??*
उद्योजक, नवउद्योजक, युवा वर्ग, महिला यांच्यामध्ये या कार्यक्रमाबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
ना.नारायणराव राणे, केंद्रीय कॅबिनेट मंत्री सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, भारत सरकार यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होत आहे. त्यामागची पार्श्वभूमी अशी आहे, की हा जिल्हा ही आपली कर्मभूमी किंबहुना आपलं घर, आपला परीवार आहे ही राणेसाहेबांची नेहमीच भावना राहिली आहे. आज देशातील जवळपास सर्वच उद्योग ज्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतात, कालच्या बजेटमध्येही भरीव तरतूद ज्या खात्यासाठी झाली आहे, त्या खात्याच्या योजनांचा उपयोग आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवावर्गाला झाला पाहीजे, त्याचा उपयोग करून या जिल्ह्याचे अर्थकारण बदलले पाहिजे या हेतूने हा कार्यक्रम जिल्ह्यात घेतला जात आहे. या मंत्रालयाच्या किमान दोनशे योजना आहेत. त्या कोणत्या आहेत, त्यासाठी काय अर्हता आपल्याकडे असली पाहिजे, आपण व्यक्तीगतरीत्या, किंवा एकत्र येऊन त्या योजनांचा कसा फायदा घेऊ शकतो, याची माहिती नसल्याने आपण खऱ्या अर्थाने विकासात मागे राहिलो. या सगळ्या योजनांची माहिती कोकणातील, विशेषतः जवळच्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील युवावर्गाला व्हावी यासाठी हा कार्यक्रम राणेसाहेबांच्या संकल्पनेतून आणि केंद्राच्या एमएसएमई मंत्रालयाच्या माध्यमातून होत आहे. विकासाच्या या उद्योगयात्रेत आपल्याला काय काय घेता येईल, हे पाहण्यासाठी प्रत्येकाने सहभाग घ्यायलाच हवा. उद्योजकांनी तर यायला हवेच, पण भावी उद्योजक बनण्याची ईर्षा बाळगणाऱ्या इथल्या युवावर्गाने उपस्थित या कार्यक्रमात सहभागी होणे अधिक अपेक्षित आहे. २५ व २६ फेब्रुवारीला कुडाळ, ओरोस, कणकवली येथे होत असलेल्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून केंद्रीय लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योग खात्याच्या वेगवेगळ्या योजना, प्रकल्प याची माहीती देऊन मार्गदर्शन केले जाणार आहे. देशातील साठपेक्षा अधिक अतिवरीष्ठ व वरिष्ठ तज्ञ अधिकारी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाण मांडून आहेत. नाविन्यपूर्ण उद्योगांची आणि मोठा आवाका असलेल्या उद्योगक्षेत्रांची ओळख या कार्यक्रमामुळे इथल्या उद्योजकांना होणार आहे. आजची बदललेली आधुनिक टेक्नॉलॉजी, अर्थपुरवठा, केंद्र शासनाकडून मिळणारी सबसिडी अशा अनेक गोष्टींची माहिती केंद्राकडून येणाऱ्या तज्ञांकडून मिळवण्यासाठी इथल्या उद्योजकांना ही फार मोठी सुवर्णसंधी आहे. दिल्लीला गल्लीपर्यंत आणण्यासाठीच्या राणेसाहेबांच्या प्रयत्नांना खरोखरच सलाम आहे, पण इथले उद्योग जेव्हा गल्लीतून दिल्लीपलिकडे उभारी घेतील तेव्हाच या सगळ्या भगीरथ-प्रयासांचे खऱ्या अर्थाने चीज होईल.
आज त्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यावर उद्योजकतेच्या त्या स्वप्नाच्या दिशेने वाटचाल करण्याची हिंमत बाळगणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की या सगळ्याकडे गांभीर्याने पाहणे! सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (Ministry of Micro, Small & Medium Enterprises) आपले तज्ञ मार्गदर्शक आपल्याला योग्य मार्गदर्शन व्हावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्यक्ष येऊन आपणा सर्वाना त्यांच्या विविध योजनांची माहिती देणार आहेत. या योजनांचा लाभ कसा घ्यावा याचे मार्गदर्शन करून त्यासाठी आवश्यक असणारी सर्वतोपरी मदतही करणार आहेत. एरव्ही, या सगळ्यासाठी दिल्लीत जाऊन प्रयत्न करणे किती कष्टप्रद असेल याची साधारण कल्पना प्रत्येकाला आहेच. राणेसाहेबांनी ही विकास गंगा आपल्या दारापर्यंत आणली आहे. आता आपल्या घोड्यांना पाणी कसे पाजायचे आणि विकासाच्या मार्गावर कसे चौखूर उधळायचे हे मात्र आपल्या हातात, आणि त्यासाठी २५ फेब्रुवारीला ओरोसचे शरद कृषी भवन आणि २६ फेब्रुवारीला कणकवलीचे प्रहार भवन आपल्या प्रतीक्षेत आहे.
*कसा असेल हा कार्यक्रम?*
ना.नारायणराव राणे यांच्या संकल्पनेतून होत असलेला कार्यक्रम हा एका अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला उद्योगाचा नवा आवाका दाखवून देत नव्या उद्योजकतेची बीजे रोवणारा आहे. याची नोंद सिंधुदुर्गच्या भविष्यकाळाला नक्कीच घ्यावी लागणार आहे. हा कार्यक्रम म्हणजे आरंभ है…प्रचंड है असा म्हणावा लागेल.
या कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे.
दिनांक २५ व २६ फेब्रुवारीला सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात २५ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता कुडाळपासून होईल. सकाळी १० वाजता कुडाळ बस स्थानक मैदानावर भरवल्या जाणाऱ्या “कॉयर प्रदर्शना”चे उद्धाटन एमएसएमईचे मंत्री मा. नारायणराव राणे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर १०:३० वाजता कुडाळ एमआयडीसी येथील कॉनबॅक स्फूर्ती बांबू क्लस्टरचे उद्धाटन करून मा.राणेसाहेब ओरोस शरद भवन येथे मुख्य कार्यक्रमाला रवाना होतील.
सकाळी ११ वाजता सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे शरद कृषी भवनमध्ये “एमएसएमई उद्योजकता विकास कार्यक्रमा”चा उद्धाटन सोहळा राणेसाहेबांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रशिक्षण प्रमाणपत्रांचे वितरण, प्रशिक्षितांना मधमाशांच्या पेट्या, कुंभारचाके, अगरबत्ती मशीन यांचे वाटप, शेतकऱ्यांना बांबू रोपांचे वाटप केले जाणार आहे.
दुपारी १२:०० ते १:०० या वेळात एमएसएमई योजना आणि ईडीपी कार्यक्रमाच्या माहीतीचे सादरीकरण होईल. दुपारी ०१:०० ते ०२:०० रूपे कार्ड लॉन्च करणे आणि एमएसएमई उद्योजकांना रूपे कार्डच्या पहिल्या बॅचचे वितरण असा कार्यक्रम होईल.
दुपारी ०३:००ते ०४:०० या वेळात कॉयर बोर्डासंबंधीच्या योजनांच्या माहितीचे सादरीकरण एफएफडीसी कनौजद्वारे सादरीकरण, मशरूम लागवडीचे सादरीकरण करण्यात येईल.
दुसऱ्या दिवशी शनिवार दिनांक २६ फेब्रुवारीला सकाळी १०.१५ ते १०.३० या वेळेत कणकवलीत प्रहार भवन येथे कॉयर बोर्डाच्या प्रादेशिक कार्यालयाचे ना. राणेसाहेबांच्या हस्ते उदघाटन होईल. त्यांनतर १०:३० ते ०३:०० वाजेपर्यंत कणकवली प्रहार भवन येथे अनुसूचित जाती/जमाती उद्योजकांसाठी विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वंचित समाजाच्या उद्योजकांना एमएसएमईच्या योजनांचा फायदा व्हावा आणि खऱ्या अर्थाने आर्थिक समृद्धी सर्वसामान्य समाजात रुजावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वंचित समाजाच्या (SC, ST) उद्योजकांचा विकास कार्यक्रम व केंद्रीय लघु सूक्ष्म उद्योग खात्यातील वेगवेगळ्या उद्योग विषयातील योजना यांचे मार्गदर्शन या मेळाव्यात होईल.
या मार्गदर्शन मेळाव्याला मा.नारायणराव राणे,
केंद्रीय कॅबिनेट मंत्री व मा.मिलिंद कांबळे,राष्ट्रीय अध्यक्ष, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज हे उपस्थित रहाणार आहेत. नाविन्यपूर्ण उद्योगांची ओळख, कॉयर बोर्ड (नारळाच्या काथ्यापासून बनवलेल्या विविध वस्तू) प्रदर्शन, वंचित समाजाला उद्योगांसाठी मार्गदर्शन स्टॉल, आधार उद्योग नोंदणी मार्गदर्शन, वंचित समाजातील उद्योजकांनी उत्पादित केलेला माल शासन खरेदी करण्यासाठीचे मार्गदर्शन, शासकीय ठेक्यामध्ये ३०% आरक्षणाबाबत माहिती,उद्योगाला अर्थपुरवठा व सबसिडी यांची माहिती या अनुषंगाने यावेळी मार्गदर्शन करण्यात येईल.
या एमएसएमई उद्योजकता विकास कार्यक्रमासाठी सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार, यांच्यासह, नॅशनल स्मॉल इंडस्ट्री कॉर्पोरेशन, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग यांचा सहभाग असणार आहे. उद्योजक, ठेकेदार, सेवा देणारे उद्योजक, नवीन उद्योग सुरु करणारे नवउद्योजक, कारागीर यांनी सहभाग दाखवत आपल्या आर्थिक प्रगतीची दिशा ठरवावी. कोकणच्या या महा-उद्योगयात्रेची सांगता आर्थिक उन्नतीच्या फलप्राप्तीनेच व्हावी.
तूर्तास — येवा… कार्यक्रम आपलोच आसा!!
*—–अविनाश पराडकर, सिंधूदुर्ग*