देवगड
महाशिवरात्रीनिमित्त भरणारी श्री कुणकेश्वर देवस्थानाची यात्रा 1 मार्च व 2 मार्च रोजी पार पडत आहे. या यात्रेनिमित्त भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र येथील पापडीचे व पायऱ्यांचे काम अजूनही अपूर्णावस्थेत होते. हे काम आता आमदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे मार्गी लागले आहे.
आमदार नितेश राणे यांनी यातत्रा तयारीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच श्री क्षेत्र कुणकेश्वरला भेट दिली होती. तेथील पदाधिकारी व ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे याबाबत सविस्तर माहिती दिली होती. या पापडीचे व पायऱ्यांचे काम धीम्या गतीने सुरू होते. आमदार नितेश राणे यांनी सदर ठेकेदाराला काम पूर्ण करण्याची सूचना केली. ठेकेदारांनी कामाला गती देऊन हे काम पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे याच मार्गावरून देवगडहून कुणकेश्वरला व पुढे कातवण-मीठबावला गाड्यांची रहदारी असते. यामुळे वाहनचालकांचीही मोठी सोय झाली आहे. आमदार नितेश राणे यांच्या या सहकार्याबद्दल सर्वांनीच समाधान व्यक्त केले आहे.