वैभववाडी
अज्ञान, अंधश्रद्धा व अस्वच्छता यांचे उच्चाटन करणारे ‘तिर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी’ असे सांगत दीन, दुबळे, अनाथ अपंगांची सेवा करणारे तसेच माणसात देव शोधणारे संत म्हणजे राष्ट्रसंत गाडगे महाराज होय असे प्रा.श्री.एस.एन.पाटील यांनी सांगितले.
महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग आणि इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती कार्यक्रम प्राचार्य डॉ.सी.एस. काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रा.एस.एन.पाटील यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज त्यांच्या जीवन कार्याचा आढावा घेताना गाडगे महाराज एक थोर कीर्तनकार, संत व समाजसुधारक व स्वच्छतेच्या माध्यमातून जनजागृती करणारे विसाव्या शतकातील क्रांतिकारी समाज सुधारक होते. समाज प्रबोधन असताना देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, व्यसन करू नका, अडाणी राहू नका असा संदेश देणारे, देव दगडात नसून माणसात आहे. तसेच संत तुकाराम महाराजांना गुरु मानणारे परंतु मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही असे ठामपणे सांगणारे गाडगे महाराज होते. त्यांचे वैज्ञानिक विचार समजून घेऊन आचरणात आणण्याची गरज आहे असे प्रा.पाटील यांनी सांगितले.
संत गाडगे महाराज यांचे विचार समाजाला दिशादर्शक असून स्वच्छतेबरोबरच मानसिक गुलामगिरी नष्ट करण्याचा महान संदेश समाजाला दिला असे प्रा.आर.एम.गुलदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले. गाडगे महाराजांचे विचार आणि कार्य आजच्या समाजाला व तरुणांना समजण्यासाठी त्यांचे जीवनचरित्र अभ्यासले पाहिजे. गाडगे महाराजांचे विचार स्वीकारून समाजापर्यंत पोचविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असे अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. गाडगे महाराज यांचे प्रतिमापूजन व दिप प्रज्वलन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागाचे सदस्य प्रा. राहुल भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.संजीवनी पाटील यांनी केले.