You are currently viewing कोल्हापुरी साज

कोल्हापुरी साज

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ रेखा कुलकर्णी यांची अष्टाक्षरी अलंकार काव्यमाला

ठुशी घट्ट गळ्यामध्ये,
तिच्याखाली सैल जरा.
कोल्हापुरी साजावर,
स्थिर झाल्या ग नजरा.

लाख भरले आकार,
सोन पत्र्यांनी मढले.
जवा मनी नि पानड्या,
मुशीतून काढलेले.

मासा, कमळ, कारले.
शंख, नाग, बेलपान‌.
सूर्य, चंद्र आणि भुंगा,
याला शोभतात छान

विष्णू अवतारी डुल,
दहा असती लावले.
अष्ट मंडळाचे आठ,
दोन माणिक पाचूचे.

मध्यभागी शोभतसे,
एक डुलाचे डोरले.
अशी संख्या एकेवीस,
सोनं तारेने सजले.

असे नाव याचे दुजे,
दशअवतारी हार.
साठ वर्षापासूनचा,
इतिहास साक्षीदार.

महालक्ष्मीचा शृंगार,
भासे अधूरा अधूरा.
कोल्हापुरी साजाविन,
कसा होईल हो पुरा.

रेखा कुलकर्णी©®
चिंचवड पुणे
सर्व हक्क स्वाधीन
२२/९/२०

प्रतिक्रिया व्यक्त करा