You are currently viewing मनाची स्थिरता..

मनाची स्थिरता..

 

पंढरपूरचा विठोबा युगे अठ्ठावीस विटेवर स्थिर उभा आहे.त्याप्रमाणे *मनाला अखंड स्थिर उभे रहाण्यासाठी वीट पाहिजे.परंतु ही वीट अशी पाहिजे की,ती मनापेक्षाही सूक्ष्म आहे,निदान मनाइतकी तरी ही वीट सूक्ष्म पाहिजे.शिवाय ही वीट अत्यंत स्थिर,अक्षय,शाश्वत,अखंड व नित्य उपलब्ध अशी पाहिजे.* आता पुन्हां प्रश्न निर्माण होतो की,ही वीट आणायची कोठून?या प्रश्नाचे उत्तर असे की.मनाचे मुळ हीच आहे मनाची खरी वीट मूळ सोडून,वीट सोडून मन जेव्हां नाना ठिकाणी भ्रमण करते तेव्हां या सर्व भ्रमंतीतून आपल्या वाट्याला येतात ते फक्त कष्ट,खर्च व दैन्य.परंतु *मन जेव्हां आपल्या मुळाकडे वळते व तेथे रमते तेव्हां आपला सर्व शीण,भाग व दैन्य तात्काळ नाहीसे होतात.तुकाराम महाराज हेच सांगतात,*

 

*१) आता कोठे धांवे मन। तुझे चरण देखिलीया।।*

*भाग गेला शीण गेला। अवघा झाला आनंद।।*

*२) नाही त्रिभुवनी सुख या समान।*

*म्हणवूनी मन स्थिरावले।।*

*३) अवघेचि त्रैलोक्य आनंदाचे आता।*

*चरणी जगन्नाथा चित्त ठेले।।*

 

*तात्पर्य,मनाला जी वीट पाहिजे ती वीट म्हणजे,मनाचे मूळ म्हणजेच विठाई माऊली.रडणाऱ्या मुलाला कितीही खेळणी दिली तरी ते उगे रहात नाही.पण त्याला आई दिसली की रडणे तात्काळ बंद होते.त्याप्रमाणे मनाचे समाधान जगातील कुठलेही विषय करू शकत नाहीत.परंतु मनाला आई म्हणजे विठाई मिळाली की मन तात्काळ शांत होते. देवाचे चरण,जगन्नाथाचे चरण,विठोबाचे चरण म्हणजेच आहे मनाचे मूळ.या मुळाकडे मन वळविल्याशिवाय मनाची वळवळ व चळवळ थांबत नाही मुळाकडे मन वळविणे म्हणजेच आपल्या स्वस्वरूपाकडे मन वळविणे.परमामृत या ग्रंथात मुकुन्दराज हेच सांगतात व तुकाराम महाराज सुद्धा तेच सांगतात,*

 

*१) उफाराट्या दृष्टीचे पहाणे।*

*ते दृष्ट्यामाजी दृष्टी मुरविणे।*

*पहातया मुळासी जाणे स्वस्वरूपेसी।।*

*२) तुका म्हणे मन उफराटे होय।*

*तरीच हे अपाय मावळती।।*

 

*विठ्ठलाची-स्वस्वरूपाची न विटणारी अवीट वीट एकदा का मनाला मिळाली की मन तृप्त होते,मुक्त होते,भक्त होते.*

एकनाथ महाराज व तुकाराम महाराज हेच सांगतात.

 

*१) चित्त चाकाटले स्वरूपामाझारी।*

*ते न निघे बाहेरी ऐंसे झाले।।*

*२) चित्त विसरोनी चित्ता जडोनी ठाके भगवंता।*

*मनाची मोडली मनोगतता।*

*संकल्प विकल्पता। करूं विसरे।।*

*३) लाचावले मन लागलीसे गोडी। ते जीवे न सोडी ऐसे झाले।।*

 

*आतां पुन्हा प्रश्न निर्माण होतो तो असा की,मन मुळाकडे वळवायचे कसे? याला उत्तर हेच की मन मुळाकडे वळविणे व तेथे ते स्थिर करणे हे ज्या मार्गाने करावयाचे असते ते मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक भेटावे लागतात.येरा गबाळाचे ते कामच नाही.अशा मार्गदर्शकालाच श्रीसद्गुरू असे म्हणतात.*

म्हणूनच तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज हेच सांगतात,

 

*१) सद्गुरू वाचोनि सांपडेना सोय।*

*धरावे ते पाय आधी आधी।।*

*२) जाणतेन गुरू भजिजे। तेणे कृत कार्य होईजे।।*

*जैसे मूळ सिंचने सहजे। शाखा पल्लव संतोषती।।*

*३) संतांचे संगती मनोमार्ग गती।*

*आकळावा श्रीपती येणे पंथे।।*

 

अशा सद्गुरुचा परम भाग्याने लाभ होतो व जीवन कृतार्थ होते.

आता पुन्हां प्रश्न निर्माण होतो तो असा की,असा खरा सद्गुरू भेटेपर्यंत काय करायचे?याचे उत्तर असे की ज्याला जे सुचेल ते त्याने करावे.ज्ञानेश्वरीची पारायणे करावीत,जप-तप करावेत,तीर्थयात्रा कराव्यात, पूजा-अर्चा करावी,उपास-तापास करावेत,व्रत-वैकल्ये करावीत. देवाची सेवा जशी करता येईल तशी करावी मग कदाचित देवालाच जर दया आली तर तो खऱ्या सद्गुरुची गांठ घालून देईल. *वरील उपासनेच्या सर्व प्रकारांत नामस्मरण हा प्रकार सर्वात श्रेष्ठ व सुलभ असल्यामुळे सर्वांनी नामस्मरणाची कास धरणे चांगले.म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात,*

*हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा।*

*पुण्याची गणना कोण करी।।*

🙏~सद्गुरु श्री वामनराव पै.🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा