*आपण जे चिंतन करतो ते बहुतेक चिंता या स्वरुपात असतं . आयुष्याची चिंता आणि भूतकाळात होऊन गेलेल्या गोष्टींचे अनिष्ट चिंतन असं चिंता आणि चिंतन अशा कात्रीत आपलं जीवन कातरलं जात असतं आणि ‘ सुख पहाता जवापाडे दुःख पर्वता एवढे ‘ असा अनुभव बहुतेक लोकांना प्राप्त होतो .*
अनिष्ट चिंतन माणसाच्या जीवनामध्ये सतत चाललेलं असतं आणि ९९.९९ % लोकांना आपण अनिष्ट चिंतन करतो हेच माहित नाही . परिणामी या अनिष्ट चिंतनाचे दुष्परिणाम जेव्हा त्याच्या वाट्याला येतात , तेव्हा तो जागा होतो . पण अनिष्ट चिंतन केल्यामुळे हे होत आहे हे त्याला माहीत नसते .
*अनिष्ट चिंतन केल्यामुळे हे सगळे अरिष्ट आणि दुःख आपल्याला वाट्याला आलेलं आहे हे त्याला ठाऊक नसतं आणि त्याचा शोध तो भलत्याच ठिकाणी घेतो .*
मग कुणीतरी म्हणेल करणी केली , कोणीतरी मूठ मारली , कुठे भूतबाधा झाली , कुठे नवस केला पण तो फेडला नाही . असा बादरायण संबंध तो जोडतो आणि त्यामुळे ‘ बुडत्याचा पाय खोलात ‘ याप्रमाणे त्याची अवस्था होते .
*– सदगुरु श्री.वामनराव पै.*